आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाट वाहन चालवाल तर लायसन्स होणार रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-तुमचं वय 16 वर्षांपेक्षा कमी असूनही लायसन्स नसताना तुम्ही वाहन चालवत असाल, दुचाकीवर तिघे जात असाल किंवा सुसाट वेगात वाहन चालवत असाल, तर आता आरटीओच्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल. कैकपट महागात पडणारी ही कारवाई कोणत्याही क्षणी शहरात सुरू करण्याचा इशारा अमरावती विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी र्शीपाद वाडेकर यांनी दिला आहे.
शहरातील रस्त्यांवरून तरुण, तरुणी सुसाट वेगाने वाहन चालवतात. जेमतेम 12-15 वर्षांच्या मुला-मुलींना पालक वाहन उपलब्ध करून देतात. अशाच एका युवतीमुळे इर्विन चौकात काही दिवसांपूर्वी एका 62 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. अपघातानंतर या मुलीला गुन्हा घडल्याचे कसलेही भय तिच्या चेहर्‍यावर नव्हते. उलट तिने उद्धटपणा केला होता. अशा अनेक तक्रारी आरटीओकडे येत आहेत.
त्यामुळे त्यांनीच आता स्वतंत्रपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओ केवळ महामार्गावर कारवाई करतात किंवा ट्रक, कंटेनर चालकांकडून वसुली करतात, शहरात त्यांचे अजिबात लक्ष नाही, अशी टीका सतत होत असते. मात्र, या टीकेला उत्तर देण्यासाठी शहरातील दुचाकी, ऑटो, कार, टेम्पो, बस यांची तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणार्‍या चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असल्याचे वाडेकर यांनी नमूद केले.
गय करणार नाही
आम्ही यापूर्वी दोनदा वाहनचालकांना इशारा दिला होता. त्यानंतरदेखील काही वाहनचालक नियम मोडत आहेत. त्यामुळे आता आम्ही कारवाई करणार. लायसन्स निलंबित केले जातील. प्रसंगी वाहन जप्त केले जाईल. आरटीओचा दंड पोलिसांच्या दंडापेक्षा 100 पट अधिक आहे. त्यामुळे चालकांनी सावध व्हावे. र्शीपाद वाडेकर, आरटीओ.