आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपड्या हटवल्याने चिमुकली दगावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नवसारी परिसरातील शासकीय जागेत वसलेल्या काही झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी हटवल्या. यावेळी एका झोपडीत राहणारी दहा दिवसांची चिमुकली सायंकाळी दगावली. ४६ अंशाच्यावर असलेले ऊन, धूळ असह्य झाल्यामुळेच आमची मुलगी दगावल्याचा आरोप मृत बालिकेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी बालिकेचा मृतदेह पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर आणून जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.मात्र,पालकमंत्री शहरात नसल्यामुळे नातेवाईकांना हे निवेदन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात द्यावे लागले. हा घटनाक्रम शनिवारी दुपारी घडला.
नवसारी बसस्टॉप परिसरात शासकीय जागेवर मागील अनेक वर्षांपासून २० ते २५ झोपड्या वसल्या होत्या.या झोपड्या हटविण्यासंदर्भात महापालिकेने नागरिकांना सूचित करूनही झोपड्या कायम ठेवल्याने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या झोपड्यांवर गजराज चालवून अतिक्रमण हटवले. यावेळी एका झोपडीत लता सुरेश तांबेकर ही महिला आपल्या दहा दिवसांच्या चिमुकलीसह होती. झोपड्या हटवल्यामुळे लता तांबेकर यांनी आपल्या चिमुकलीला घेऊन झाडाच्या सावलीचा आधार घेतला. मात्र प्रखर उन्हाचा तडाखा आणि परिसरात उडणारी धूळ यामुळे ती चिमुकली अस्वस्थ झाली. दुसरीकडे झोपड्या हटवल्याने पुरूष मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यामुळे या चिमुकलीच्या प्रकृतीची त्यांना माहिती नव्हती. शुक्रवारी सायंकाळी सुरेश तांबेकर, त्यांचे वडील देवराज तांबेकर हे जेव्हा झोपड्यांजवळ पोहचले.
त्यांनी चिमुकलीला जवळ घेतले असता तिची हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यांनी तातडीने चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
झोपडी हटवल्याने कडाक्याचे उन्ह लागल्याने मुलगी दगावल्याचा आरोप करून नातेवाईक शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी देवराज तांबेकर यांच्या मौखिक तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली. शनिवारी चिमुकलीचे शवविच्छेदन करण्यात आले. घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून चिमुकलीचे वडील सुरेश तांबेकर, आजोबा देवराज तांबेकर, शिवसेनेचे उपशहर प्रमुख पंजाबराव तायवाडे, जगदीश श्रीवास नातेवाईकांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयात निवेदन सोपवून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
मृतदेह पालकमंत्र्याच्या घरासमोर : दहादिवसांच्या चिमुकलीचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाले.अतिक्रमण हटवल्यामुळेच आमच्या चिमुकलीचा जीव गेला, असा आरोप करत चिमुकलीचे नातेवाईक मृतदेह घेऊन थेट पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या वेळी पालकमंत्री शहरात नसल्याने निवेदन कार्यालयात द्या,असे सांगितले. त्यानंतर पोटे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
- शुक्रवारी रात्री चिमुकलीचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते. चिमकुलीच्या मृत्यूप्रकरणी आम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप सांगता येत नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
कैलाश पुंडकर,ठाणेदार, गाडगेनगर.
झोपडी हटवल्यामुळेच दगावली मुलगी
- अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी राहतो. मला दहा दिवसांची मुलगी होती. शुक्रवारी पालिकेने अतिक्रमण हटवल्याने माझ्या मुलीला उन्हाच्या झळा धुळीचा त्रास झाल्यानेच ती दगावली. जिल्हाधिकारी मनपा आयुक्तांविरुद्ध कारवाईची मागणी आम्ही पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे केली आहे.
सुरेश तांबेकर,मृत बालिकेचे वडील.
आमच्या कारवाईचा मृत्यूशी संबंध नाही
- नवसारीपरिसरात आम्ही कारवाई केली, त्यावेळी एका झोपडीमध्ये लहान बाळ असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही त्या दोन झोपड्यांवर कारवाई केली नाही. त्यामुळे या बाळाच्या मृत्यूचा आणि आमच्या कारवाईचा काहीही संबध नाही.
गणेश कुत्तरमारे, अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख.
बातम्या आणखी आहेत...