आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधारभूत’चाही घसरला आधार - तूर, उडीद, हरभरा घसरले हमीभावाच्याही खाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती -आधारभूत किमतीवर आधारित शासकीय खरेदी केंद्र केवळ हंगामापुरतीच सुरू राहत असल्यामुळे तूर, हरभरा, भुईमूग, उडदाचे भाव हमीभावापेक्षाही खाली घसरल्याने शेतक-यांना मालाची बेभाव विक्री करावी लागत आहे.
शेतक-यांना शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागू नये म्हणून दरवर्षी शासनामार्फत खरेदी केंद्र सुरू करून खरीप व रब्बी हंगामात शेतमालाची खरेदी केली जाते. साधारणपणे ही खरेदी माल खरेदी केंद्रांत येईस्तोवर अथवा हंगामातील तीन महिने सुरू असते. यात खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके तर रब्बीतील हरभरा, गहू आदी पिकांचा समावेश असतो. शासकीय खरेदी सुरू राहिल्यास व्यापारी शेतक-यांचा माल चढ्या दराने खरेदी करतात. याचा फायदा शेतक-यांना होतो; परंतु यावर्षी बाजारभाव खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्यामुळे शेतक-यांनी मागील हंगामातील हरभरा, तूर, उडीद आदी शेतमाल घरीच मोठ्या प्रमाणात भरून ठेवला होता. चालू रब्बी हंगामासाठी शासनाने हरभ-याचे हमीभाव 3100 रुपये, उडीद व तुरीचे हमीभाव 4300 रुपये घोषित केले आहे. परंतु,मागील दोन महिन्यांपासून तूर व हरभ-याच्या भावात सतत घसरण सुरू आहे. सध्या तूर, हरभरा, उडदाचे भाव हमीभावाच्या खाली घसरले आहेत. बाजारात भावाबाबत कोणतेच संरक्षण नसल्यामुळे शेतक-यांना नाईलाजाने मालाची बेभाव विक्री करावी लागत आहे. शासकीय खरेदी नसल्यामुळे हरभ-याला किमान 2000 तर कमाल 2500 रुपये, उडीद 3500 ते 4000, तुरीला 3850 ते 4000 रुपये दर मिळत आहे. दरम्यान, चालू रब्बी हंगामात तूर व हरभ-याचे पीक चांगले आहे. हरभ-याचे क्षेत्रही प्रचंड वाढले आहे.

शासनाचीही फसवणूक
शासकीय खरेदी वर्षभर सुरू ठेवली, तर भाव कोसळल्यानंतर व्यापा-यांचाच माल शासकीय खरेदी केंद्रांवर येण्याची शक्यता असते. त्यामुळे यात शासनाचीही फसवणूक होण्याचा धोका असतो. खरेदी केंद्रांवर व्यापारी व शेतकरी ओळखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे याचा फटका शेतक-यांना नाहकच बसत आहे.

खरेदी केंद्र हंगामापुरतीच
शासकीय खरेदी केंद्र केवळ हंगामापुरतीच सुरू ठेवता येतात. गोदामे भरल्यानंतर माल ठेवण्याचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शासकीय खरेदीत अनेक मर्यादा आहेत.
चांगदेवराव होळकर, संचालक, नाफेड.