अमरावती- येथील राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने पाच कर्तृत्त्ववान महिलांना पुरस्कृत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मंगळवारी एका हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या महिलांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मेळघाटच्या डॉ. स्मीता कोल्हे, हव्याप्र मंडळाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी झटणाऱ्या डॉ. माधुरी चेंडके, उद्योग जगतात नावलौकीक असलेल्या नागपूरच्या उज्वला हावरे, चित्रपटसृष्टीतील अलका कुबल प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट व्यक्तीमत्त्व असलेल्या मुंबईच्या संगीता धायगुडे यांचा समावेश आहे. डॉ. हर्षा गोरटे, अॅड. सुषमा बिसने, किर्ती खन्ना, सारिका फुलाडी जीनत अजिज पटेल या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पाच सदस्यीय निवड समितीने ही नावे निश्चित केली आहेत.
प्रशस्तीपत्र, मानचिन्ह शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच घोषित केली जाईल, असेही महात्मे यांनी या वेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. गणेश काळे, सचिव माधुरी ढवळे, सदस्य अशोकराव गंधे, जानराव कोकरे, मीनाक्षी कोल्हे, डॉ. हर्षा गोरटे, किर्ती खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
योगदान वाखाणण्याजोगे
ज्यांच्या नावाने फाऊंडेशन तयार केले गेले त्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर या अठराव्या शतकातील राणी होत. अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी (ता. जामखेड) येथे जन्मलेल्या राणी अहल्यादेवी यांनी बरीच वर्षे राज्यकारभार चालवला. एक महिला राज्यकर्ती म्हणून त्यांचा त्या काळातील पराक्रम वाखण्याजोगा आहे. मध्य भारतातील इंदौर िवमानतळाला त्यांचे नाव आहे.
पुरस्काराचे मानकरी
समाजकार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. स्मीता कोल्हे, हव्याप्रमंच्या डॉ. माधुरी चेंडके, उद्योजिका उज्वला हावरे, सिनेअभिनेत्री अलका कुबल, प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट व्यक्तीमत्त्व असलेल्या संगीता धायगुडे यांच्या नावांची या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे.