आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • "The Salvation Of The Human Culture Of Freedom DR. Salunkhe,

‘मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष-डॉ. आ. ह. साळुंखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वैदिक ग्रंथांपासून ते अनेकांच्या मांडणीत चार्वाक चुकीच्या पद्धतीने सादर केला जातो, हे अधोरेखित करतानाच मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजेच चार्वाक, हे तत्त्वज्ञान स्वीकारले गेले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत-लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी शनिवारी येथे केले.
‘आम्ही सारे’ फाउंडेशनतर्फे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेतील ‘चार्वाकांचा विवेकी विचार’ या विषयावर ते बोलत होते. बुद्धिप्रामाण्यवाद हा आजही सरमिसळ झालेला मुद्दा आहे. जे स्वीकारायचं ते तपासून घ्या, आंधळेपणानं स्वीकारू नका, हे चार्वाकांचे तत्त्वज्ञान आहे. परंपरा स्वीकारायची की स्वत:चा अनुभव, हा त्यातील भावार्थ आहे; परंतु सर्वत्र तसे होतेच, असे नाही.
त्यामुळे सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी चार्वाकांनी जी मांडणी केली, ती आजही प्रासंगिक आहे, हे डॉ. साळुंखे यांनी पटवून दिले. खच्चून भरलेल्या मातोर्शी विमलाबाई देशमुख सभागृहात बोलताना त्यांनी अनेक दाखले देत चार्वाकांची मांडणी ही मानवी जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करणारी असल्याचे स्पष्ट केले. ती मांडणी मानवी कल्याण, विकास आणि वैचारिक गुलामगिरीला विरोध करणारी आहे. त्यात कोणताही उथळपणा, उद्दामपणा किंवा अहिंसक तत्त्व नाही, हेही सोदाहरण स्पष्ट केले. त्यांच्या मते, चार्वाकांनी ज्ञानाची तीन प्रमाणके मांडली. त्यात प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मानवी ज्ञानेंद्रिये, अनुमान व शब्द यांचा समावेश आहे. त्यामुळे सध्याच्या पिढीने चिकित्सक बुद्धीने वागले पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला.
विभागीय आयुक्त कार्यालयात चालक म्हणून कार्यरत संजय भाकरे यांचे चिरंजीव अजिंक्य यांच्या स्मृत्यर्थ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. साळुंखे म्हणाले, भारतीय तत्त्वज्ञानात नऊ दर्शन प्रमुख आहेत. त्यांतील सहा आस्तिक व तीन नास्तिक आहेत. जैन, बौद्ध आणि चार्वाक ही नास्तिक दर्शन आहे. मंचावर अरविंद गावंडे व संजय भाकरे उपस्थित होते. व्याख्यानाची पार्श्वभूमी अविनाश दुधे यांनी विषद केली. कार्यक्रमाला राजकीय, शैक्षणिक व इतर क्षेत्रांतील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.