आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल ग्रँड महफिल इनमधून तीन लाखांचे दागिने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - हॉटेल ग्रँड महफिल इनमधून शनिवारी रात्री ग्राहकाचे दागिने व रोकड लंपास झाल्याप्रकरणी संबंधिताने रविवारी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. चोरट्याने हिरेजडित दागिन्यांसह रोकड, असा तीन लाख 11 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

कन्हय्यालाल जेठानंद नंदवानी (44, रा. जरीपटका, नागपूर) हे कुटुंबीयांसह भाचीच्या लग्नकार्यासाठी शनिवारी अमरावतीत आले होते. ते हॉटेलच्या खोली क्रमांक 118 मध्ये थांबले होते. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खोलीतून सर्वजण बाहेर गेले. त्या वेळी दागिने व रोकड खोलीतच लॅपटॉपच्या बॅगमध्ये ठेवले होते. रात्री बाराच्या सुमारास नंदवानी यांचे नातेवाईक विनोद बजाज हे खोलीत आले, त्या वेळी त्यांना दागिने आढळले नाहीत. त्यांनी तत्काळ नंदवानी यांना माहिती दिली.

नंदवानी यांनी पाहणी केली असता, चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नंदवानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. खोलीच्या मागच्या बाजूच्या जिन्यावरून खिडकीचे स्क्रू तोडून चोरटे खोलीत शिरले आणि त्यांनी चोरी केली, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे दुय्यम पोलिस निरीक्षक आर. के. शर्मा, उपनिरीक्षक नीलेश चवरे तसेच ठसेतज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. हॉटेल ग्रँड महफिल इन या नामांकित हॉटेलमधून दागिने चोरी झाल्याने शहरात चर्चा आहे.