आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलच्या मुद्द्यावर आता लवकरच पासचा तोडगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिका-यांची अनुपस्थिती ऐन वेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे अमरावती शहरात आगमन झाल्याने नांदगावपेठ टोल नाक्यावर शनिवारी बोलावण्यात आलेली नियोजित बैठक टळली. मात्र, या मुद्द्यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका पाहता, पुढील बैठकीत टोल नाक्यावरून दररोज अमरावती-मोर्शी आवागमन करणा-या स्थानिकांना पास देण्याचा तोडगा निघण्याचे संकेत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदगावपेठ येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल नाका आहे. मोर्शी येथून अमरावतीत दररोज आवागमन करणारे भाजी विक्रेते, शेतकरी यांनाही टोलचा भुर्दंड बसतो. मोर्शीहून आवागमन करणा-यांना या मार्गाचा कोणताही लाभ नाही. अमरावती-मोर्शी मार्गाचे चौपदरीकरणही एनएचएआयने केले नाही किंवा या मार्गावर कोणताही पूलदेखील बांधलेला नाही; परंतु मोर्शी वळण मार्गाच्या अगोदरच नांदगावपेठचा टोल नाका असल्याने मोर्शीहून अमरावतीला आवागमन करणा-यांनाही टोल भरावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी मोर्शी-अमरावती मार्गावरून आवागमन करणा-या स्थानिकांना पासेस देण्याचा तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. टोल नाक्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची मागणी करणारे अविनाश भाकरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, एनएचएआयचे अधिकारी ब्राह्मणकर यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

अधिकारीमात्र अनुपस्थित
तहसीलदारसुरेश बगळे यांनी पत्रव्यवहार केल्यानंतरही एनएचएआयचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी एनएचएआयचे अधिकारी ब्राह्मणकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ब्राह्मणकर यांनी कर्मचा-यांना पाठवतो, असे नमूद केले.

ऐनवेळीताईंचा शहरात प्रवेश
पत्रव्यवहारकरूनही एनएचएआयचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने संबंधित अधिका-यांविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा चर्चेत असतानाच ऐनवेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ताफ्याने शहरात प्रवेश केल्याचा संदेश अधिका-यांना प्राप्त झाला. त्यामुळे राजशिष्टाचाराच्या दृष्टीने अधिका-यांना ताईंच्या स्वागतासाठी जाणे गरजेचे होते. परिणामी, ऐनवेळी बैठक पुढे ढकलण्यात आली.

पिळवणूक थांबावी
अमरावती-मोर्शीआवागमन करणा-यांची विनाकारण पिळवणूक होत आहे. आम्हाला ही पिळवणूक थांबवायची आहे. लवकरच आम्ही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार आहोत. अविनाशभाकरे, अध्यक्ष, मैत्री संघटना.

लवकरच तोडगा
टोलनाक्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही ठाम आहोत. नागरिकांनी विनाकारण पिळवणूक होणार नाही, यासाठी एनएचएआयच्या अधिका-यांना पासेस देण्याची सूचना करणार आहोत. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.