आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यात तरुणाला वाघाने झपड घालून केले ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी परिसरात वन विभागाच्या कॅमे-यात टिपलेला वाघाचा शेतातील फाईल फोटो. तरुणाचा बळी घेणारा वाघ हाच असण्याचा संशय व्यक्त होत आहे.
वणी (जि. यवतमाळ) - वणी तालुक्यातील सैदाबाद येथील तरुणाला वाघाने झडप घालून ठार केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली आहे. जगन तुकाराम गेडाम असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो दिवसभर शेतात काम करून घरी परतत असताना ही घटना घडली.

विशेष म्हणजे वाघाला पाहून घाबरून तो झाडावर चढत असताना वाघाने त्याला झडप मारून खाली पाडून ठार केले. या घटनेची माहिती मिळताच रात्रीच शिरपूर पोलिस, तलाठी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा तत्काळ बंदोबस्त करून मृतकाच्या अपंग पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी केली आहे. जगन गेडाम हा बुधवारी शेतात काम करण्यासाठी गेला होता. दिवसभर काम करून घराकडे जाण्याच्या तयारीत असताना अचानक वाघ त्याच्या शेतात शिरला. वाघाला बघताच जगन घाबरला जवळच असलेल्या रोहिणीच्या झाडावर चढायला लागला. सहा ते सात फूट उंचीवर चढल्यावर वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याला खाली पाडले त्याच्या संपूर्ण शरीराचे लचके तोडून त्याला ठार केले. जगनच्या किंचाळण्याचा आवाज लगतच्या शेतक-यांच्या कानी पडताच त्यांनी जगनच्या शेताकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वाघाने जगनला ठार केले होते. घाबरलेल्या शेतक-यांनी घटनेची ही माहिती वन विभाग, महसूल पोलिसांना िदली. माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून जगनचे प्रेत उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले. सकाळी सात वाजता उपवनसंरक्षक अनिल गिरीपुंजे सैदाबाद येथे दाखल झाले. त्यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. वाघाचे केससुद्धा झाडावर सात फूट उंचावर लागलेले आढळून आले आहे.

एक किलोमीटर अंतरावर आढळला मृतदेह
घटनेनंतर गावक-यांनी घटनास्थळ गाठले, मात्र जगनचे प्रेत आढळले नाही. घटनास्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर जगनचे प्रेत आढळून आले. नागरिकांचा आवाज ऐकून वाघसुद्धा डरकाळी ठोकत होता. नागरिकांनी पिपे वाजवले तसेच फटाके फोडल्यानंतर वाघाने जगनचा मृतदेह सोडला. जगनची मांडी तसेच छातीचा भाग वाघाने फस्त केला होता. नागरिकांनी रात्री जगनचे प्रेत चादरीमध्ये बांधून गावात आणले.

पत्नी रंजनाला नोकरी देण्याची मागणी
मृतक जगनची पत्नी रंजना ही अपंग आहे. तिला तीन तसेच एक वर्ष वयाची अशा दोन मुली आहेत. जगन हा कमावता असल्याने तिचा आधारच निघून गेला आहे. तिच्या मुलींचे भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून रंजनाला अनुकंपाअंतर्गत वन विभागाने नोकरी देण्याची मागणी सैदाबाद येथील विकेश पानघाटे यांनी वन विभागाच्या अधिका-यांकडे केली आहे. गावक-यांनी संतप्त होत वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली असता वन विभागाचे अधिकारी, ठाणेदार मनोज केदारे, तलाठी चंद्रशेखर मसराम, सुदर्शन वानोळे, उल्हास कुरकुटे, कुळसंगे, योगेश ढाले, राजू बागेश्वर या शासकीय कर्मचा-यांनी त्यांची समजूत घातली.

लोकप्रतिनिधी सैदाबादमध्ये दाखल
या घटनेची माहिती मिळताच आज मुख्य वनसंरक्षक गुरमे हे सैदाबाद येथे दाखल झाले. त्यापाठोपाठ आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तहसीलदार रणजित भोसले, मनसे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, कायरचे सरपंच अच्चू, पोलिस पाटील घुगूल, विक्की पानघाटे, गोपाल भदोरिया, प्रवीण रोगे, संजय देवाळकर, किशोर नांदेकरसह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी सैदाबादमध्ये दाखल झाले आहेत. या वेळी जगनची पत्नी रंजना हिला २८५ रुपये रोजंदारी तत्त्वावर कामावर घेऊन तिच्या नोकरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे यांनी लेखी आश्वासन लिहून दिले आहे.
‘तो’ वाघ नरभक्षी?
परिसरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी बोपापूर येथील शेतकरी, गोडगाव येथील बलकी नावाची महिला आणि बुधवारला जगन गेडाम असे तीन जण या नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. परिणामी, उपवनसंरक्षक गिरीपुंजे यांनी वरिष्ठांना या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी परवानगीसुद्धा मागितली आहे.