आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger News In Marathi, Environment, Divya Marathi,Forest

व्याघ्रगणनेसाठी डेहराडूनची चमू मेळघाटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वाघांची अचूक संख्या, त्यांना आवश्यक खाद्य आणि वातावरण, या सर्व बाबींचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी डेहराडून येथील ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची चमू मेळघाटात दाखल झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून त्यांची ही मोहीम अविरत सुरू आहे.


व्याघ्रगणना नोव्हेंबर 2013 पासून सुरू झाली असून, चार टप्प्यांतील प्रक्रियेचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, चौथा पूर्णत्वास आला आहे. डेहराडूनवरून आलेले पाच तज्ज्ञ ट्रॅप कॅमेराच्या माध्यमातून स्थानिक वनाधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने वाघांची अचूक संख्या व इतर अचूक माहिती गोळा करण्यासाठी काम करत आहेत. ट्रॅप कॅमेरा जीपीएस प्रणालीने सज्ज असल्याने वाघांच्या वास्तव्याची माहिती मिळणे शक्य झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प 2029 चौरस किलोमीटरमध्ये विस्तारलेला असून, सिपना, गुगामल आणि अकोट हे तीन मुख्य उपविभाग आहेत. डेहराडूनवरून आलेल्या चमूने मागील दीड महिन्यांपासून अकोट परिक्षेत्रापासून व्याघ्र गणनेस सुरुवात केली असून, आगामी पंधरा दिवसांत ते पूर्णत्वास येणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक 200 चौरस किलोमीटर परिसरात एकावेळी ट्रॅप कॅमेरा लावून व्याघ्रगणना केली जात आहे. 200 चौरस किलोमीटरच्या एका परिसरात जवळपास दहा ते पंधरा दिवस कॅमेरा ठेवून त्याद्वारे व्याघ्रगणना केली जात आहे. ट्रॅप कॅमेरामध्ये आलेले सर्व छायाचित्र घेऊन चमू ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ डेहराडूनच्या मुख्य कार्यालयात घेऊन जाणार आहे. तेच त्या छायाचित्रांच्या मदतीने व्याघ्रगणना करतील आणि त्यावरून वाघांची अद्ययावत संख्या वनविभागाला मिळणार आहे.


200 चौरस किमीमध्ये लागले 400 ट्रॅप कॅमेरा 2029 चौरस किलोमीटरमध्ये मेळघाट व्याघ प्रकल्प असून, यामधील 200 चौरस किलोमीटरमध्ये एकाचवेळी 400 ट्रॅप कॅमेरे लागले आहेत. याच कॅमेरांच्या मदतीने ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची चमू वाघांची अद्ययावत संख्या जाहीर करणार आहे.


व्याघ्रगणना अंतिम टप्प्यात
पाच सदस्यीय चमू मेळघाटात असून, व्याघ्रगणनेचे फेस -4 चे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच वाघांची अद्ययावत अंतिम संख्या माहीत होणार आहे. ही संख्या ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून आम्हाला कळवण्यात येणार आहे. शिवाजी भगत, विभागीय वन अधिकारी, अमरावती.