आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याघ्रतस्कराला आज अमरावतीत आणणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दिल्ली क्राइम ब्रांच, वाइल्ड लाइफ क्राइम ब्युरो आणि अमरावती वन विभाग यांच्या संयुक्त पथकाने पाच दिवसांपूर्वी दिल्लीत अटक केलेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर सर्जुला गुरूवारी अमरावती वनविभागाचे पथक विदर्भात घेवून आले. वनविभागाच्या पथकाने त्याला न्यायालयात हजर केले असता 21 सप्टेंबरपर्यंत त्याला वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामळे चौकशीसाठी शुक्रवारी त्याला अमरावती जिल्ह्यात आणण्यात येईल असे संकेत आहेत.

सर्जूचा वाघाच्या कातडीच्या तस्करीचा गोरखधंदा संपूर्ण देशात फोफावला आहे. उत्तराखंडमधील त्याच्या कारवाया उघड झाल्या आहे. अमरावती वनविभागाने त्या तस्कराची चौकशी केली. या चौकशीत सर्जूने जून महिन्यात नागपूरातून सहा वाघांचे कातडे दिल्लीला नेल्याचे उघड झाले आहे. स्थानिक शिकार्‍यांकडून सर्जु शिकार करून घ्यायचा. त्याने विदर्भातील मेळघाट, ताडोबा, तुमसर तसेच मध्यप्रदेशातून सहा वाघांची शिकार करून घेतली आहे.

याच वाघांचे अवयव घेण्यासाठी तो नागपुरात आला होता. या संपुर्ण प्रकरणात सर्जूकडून मोठय़ा प्रमाणात माहीती मिळणे अपेक्षित आहे. यातच न्यायालयाने 21 सप्टेंबरपर्यंत वनविभागाला सर्जुची कोठडी मिळाली आहे. या काळात सर्जुला घटांग व अन्य परीसरात चौकशीसाठी नेले जाणार आहे. शुक्रवारी सर्जुला अमरावतीला आणले जाणार असल्याची माहीती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

देशाबाहेरील तपास सीबीआयच्या मदतीने करणार
सर्जुने वाघाच्या कातडीची तस्करी नेपाळ, चीन व अन्य देशात केल्याची माहितीआहे. देशाबाहेरील तपास असल्यामुळे वनविभाग सीबीआयच्या मदतीने तो तपास करणार आहे.’’ मोहन झा, मुख्य वनसरंक्षक, अमरावती.

नागपुरात आणले
सर्जू हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तस्कर आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा महत्वाची आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऐनवेळी त्याला रेल्वेऐवजी विमानाने विदर्भात आणण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.

कातडीवर परफ्युम
सर्जू नागपुरातून दिल्लीला वाघांचे अवयव घेऊन जात होता. रेल्वेने तो प्रवास करायचा. वाघाच्या कातडीचा प्रचंड दुर्गंध येतो. त्यासाठी सर्जू वाघाच्या कातडीवर महागडे परफ्यूम वापरत होता. त्यामुळे उग्र दर्प येत नसे .