आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन दिन विशेष: मेळघाटच्या सौंदर्यास हवा ग्लोबल टच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- 'मेळघाटातील वन्यजीव आणि तेथे असलेली वनसंपदा ही निसर्गप्रेमींना पर्यटनासाठी नेहमीच खुणावत असते. मुक्तागिरी, मालखेड, कौंडण्यपूर, सिंभोरा ही आणखी काही स्थळे या वैभवात भर टाकतात. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांचे एकत्रित मार्केटिंग करणारी एमटीडीसी ही यंत्रणा गप्प आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त त्यामुळेच या सर्व बाबींना उजाळा देणे क्रमप्राप्त ठरते.'

जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील निसर्गसौंदर्याला जगाच्या नकाशावर स्थान उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. कुपोषणाने होणार्‍या बालमृत्यूंमुळे पर्यटकांच्या नोंदीत मेळघाटची ओळख ही फारशी चांगली नाही. मेळघाटचे निसर्गसौंदर्य, गूगामल राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प अभयारण्य, चिखलदरा, अकोटजवळ असलेला नरनाळा किल्ला असे एकाहून एक सरस असलेली पर्यटनस्थळे अमरावती जिल्ह्यात आहेत. कलालकुंडसारखे नयनरम्य धबधबे, सिपना, सापन, गडगा आणि तापीसारखे मोठे पात्र असलेल्या नद्या आहेत. जगाच्या नकाशावर निसर्गसौंदर्याची सकारात्मक माहिती पर्यटकांना मिळाल्यास मेळघाट किंवा चिखलदर्‍यात त्यांची संख्या वाढ होऊ शकते. थंड हवेच्या ठिकाणी एमटीडीसीच्या हॉटेल्सच्या तुलनेत अन्य निवास व्यवस्था ही सर्वसामान्य पर्यटकांना परवडणारी नसते. अशा वेळी पर्यटन महामंडळाच्या हॉटेलचे दर कमी असल्याने हे दर पर्यटकांच्या आवाक्यात असतात. पर्यटन महामंडळाने निवासी व्यवस्थेत वाढ केल्यास या भागात मोठय़ा प्रमाणात पर्यटक येऊ शकतात.

निसर्गसौंदर्याने नटलेली चांगली पर्यटनस्थळे असतानादेखील पर्यटन महामंडळाच्या धोरणामुळे पर्यटन विकास रखडला आहे. अमरावतीत असलेले पर्यटन महामंडळाचे कार्यालयच बंद झाल्याने चिखलदर्‍यात असलेल्या पर्यटन महामंडळाच्या संकुलाकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. चिखलदर्‍यात असलेल्या पर्यटन महामंडळाच्या हॉटेलमध्ये मोजकेच दोन कक्ष उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त चिखलदर्‍यात पर्यटन महामंडळाची निवास व्यवस्था नाही. पावसाळ्यात मेळघाट व चिखलदर्‍यात जाणार्‍या पर्यटकांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर असते. अशावेळी महामंडळालाही पर्यटकांकडून आर्थिक फायदा होऊ शकतो.