आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत पर्यटनाला मिळणार चालना, 100 कोटींचा प्रकल्‍प अहवाल तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महापालिका क्षेत्रातील दोन तलाव आणि 14 नाल्यांचे संवर्धन, सौंदर्यीकरणासाठी शंभर कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतर केंद्रीय पर्यटन विकास महामंडळाकडे पाठवण्यात येणार असून, यामुळे अमरावतीत पर्यटनविकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहराच्या पूर्वेस निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या वडाळी आणि छत्री तलावाचे सौंदर्य या प्रकल्पाच्या माध्यमातून खुलणार आहे. सद्य:स्थितीत तलावाचे पाणी घाण झाल्याने त्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तलावाला संरक्षणभिंत तयार करून, जीवसृष्टीचे संवर्धन करण्यासोबतच परिसरात बगीचा निर्माण करून प्राथमिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. विविध प्रजातींची फूलबाग विकसित करण्यासोबतच नागरिकांना फिरण्यासाठी ‘पाथ-वे’ निर्माण करण्यात येईल. लँडस्केपिंग करण्याचेही प्रकल्पात प्रस्तावित आहे.

एकंदर शहरात पर्यटन विकासाला चालणा देण्यासाठी येथे पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. पार्किंग, जॉगर्स पार्क, म्युझियम, ट्री-प्लाझा, विश्रीती ठिकाणे, प्रकाशावरील कारंजे, फीडर कॅनल, नर्सरी आदींचा विकास दोन्ही तलाव क्षेत्रात करण्याचे प्रस्तावित आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील मालखेड तलावाचा विकास करण्यात आल्याने ते पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. वडाळी आणि छत्री तलाव क्षेत्राचा विकास झाल्यास अमरावती महापालिकेच्या उत्पनातही या प्रकल्पामुळे वाढ होणार आहे.

‘बीओटी’चे काय?
छत्री तलावबाहेरील जागा ‘बीओटी’ तत्त्वावर बोडखे अँड सन्स, तर वडाळी तलाव राजहंस संस्थेला देण्यात आला आहे. वडाळी तलावाचे कंत्राट 2014 मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे तेथे अडचण येणार नाही. मात्र, छत्री तलावाचे कंत्राट दिलेल्या संस्थेसोबत केलेल्या कराराचे काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय तलाव व नाला संवर्धन योजनेतून शहरातील दोन तलाव आणि 14 नाल्यांचे संवर्धन करण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यासाठी निधीची उभारणी केली जाणार आहे. याच प्रकारची भुयारी गटार योजना 1996 मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. शासनाने त्या योजनेला मान्यता आणि निधी दिला. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. भुयारी गटार योजनेतून उभारण्यात आलेले मलशुद्धीकरण केंद्र मागील वर्षीच कार्यान्वित करण्यात आले आहे.

नाला प्रस्तावित लांबी (सर्व आकडे मीटरमध्ये)
स्मशानभूमी नाला, बडनेरा रोड 4245
गांधी विद्यालय, बडनेरा रोड 4195
साहिल लॉन, बडनेरा रोड 5365
वडनेरे बाग, बडनेरा रोड 3940
मोहिनी हॉटेल, बडनेरा रोड 2970
सिमरन हॉटेल, बडनेरा रोड 4735
सातुर्णा हॉटेल, बडनेरा रोड 3400
नवाथे नाला, बडनेरा रोड 5370
भारतीय महाविद्यालय नाला 4950
वलगाव रोड नाला 3390
चिलम छावणी नाला 2160
राठीनगर नाला 3755
रहाटगाव नाला 8190
बसस्थानक नाला 600
एकूण 57,265

महापालिकेला मिळतील शंभर कोटी
छत्री तलाव, वडाळी तलाव आणि 14 नाले संवर्धन, सौंदर्यीकरण प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रकल्पामुळे महानगरपालिकेला पर्यावरण विभागाकडून शंभर कोटी रुपये मिळतील. अतिवृष्टीने नाल्यांना आलेल्या पुराचा धोका सर्वांनी पाहिला आहे. प्रकल्पामुळे नाल्यांना संरक्षणभिंत होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे संरक्षण होण्यास मदत मिळेल. चेतन पवार, माजी सभापती, मनपा स्थायी समिती.