आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर उलटून 12 आदिवासी मजूर गंभीर, जखमींवर अचलपुरातील खासगी रुग्णालयात उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- संत्रातोडणी करण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात १२ आदिवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अचलपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सावळी बु.-येवता मार्गावर शनिवारी (दि. २९) दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाले नाही.
कांतीलाल बोरखडे ( ३५, रा. वलगाव), नानकी कास्देकर (१८), कुसुम कास्देकर (२१), ित्रटी पटोरकर (१९), सरिता कास्देकर (१८), बसंती मावस्कर (२०), सुमती मावस्कर (२८), अशोक पटोरकर (२१), मालती भिलावेकर (२५), गुडीबुढा शेलोकार (४५), रूपेश सावरकर (१५), अशोक पटोरकर (३२, सर्व रा. सावरिया ता. धारणी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आदिवासी मजुरांचे नाव आहेत. परतवाडा येथील ऋषीसेठ नामक व्यक्तीने खरेदी केलेल्या सावळी बु. येथील िकशोर गावंडे यांच्या शेतातील संत्रा तोडण्याकरिता हे सर्व मजूर ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३०/ ९६५१) जात होते. दरम्यान, दुपारी भरधाव असलेले हे ट्रॅक्टर सावळी-येवता मार्गावर उलटून ट्रॉलीतील सर्व आदिवासी मजूर आणि ट्रॉलीत असलेले संत्रा तोडीचे साहित्य शिडी, कॅरेट आदी साहित्य रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात कोणाच्या डोक्याला, हाताला, पायाला जबर मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. ही घटना घडताच तातडीने विशाल गावंडे, श्रीधर गावंडे, अनिल गावंडे, प्रमोद धर्माळे, आतिष जवंजाळ, हृषिकेश गावंडे, संजय धर्माळे, सूरज गावंडे, नितीन गावंडे आदी नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील मजुरांना अचलपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हे ट्रॅक्टर टवलार येथील सुरेश पोटभरे यांच्या मालकीचे असून, ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संत्रा तोडीचा व्यवसाय तेजीत असल्याने संत्रा व्यापारी मजुरांना ट्रॉलीमध्ये कोंबून नेताना दिसून येत आहेत. तसेच ट्रॉलीमध्ये संत्रा तोडीचे साहित्य शिडी, प्लॅस्टिक कॅरेट, बांबू, तरट, दोरखंड आदी साहित्यसुद्धा लादलेले असते. परिणामी, असे जीवघेणे संकट मजुरांवर ओढवल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.