अमरावती- रोपमल्लखांबवर चित्तथरारक कर्तबगारी सादर करणाऱ्या मुली अन् अंगावर शहारे आणणारी आसनं करणारी मुलं, अशा नेत्रदीपक पारंपरिक खेळ प्रतिभेने विदेशी पाहुण्यांना शुक्रवारी श्री हनुमान व्यायामशाळेत चांगलीची भुरळ घातली. खेळाडूंचे सादरीकरण बघताना डोळ्यांची पापणीही मिटू देता, त्यांनी येथील मातीतील देशी खेळप्रकार डोळ्यांत साठवून घेतले. सादरीकरणानंतर वॉव, ऑस्सम, माइंडब्लोइंग, अशा प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून बाहेर पडत होत्या. पारंपरिक खेळासोबतच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य बघून तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पाहुण्यांनी सर्वच खेळांचा आनंद लुटत ‘इंडिया इज ग्रेट’, अशा प्रतिक्रिया दिल्या.
प्रारंभी पंजाबच्या सुप्रसिद्ध भांगडा नृत्याने देशातील सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवण्यात आले. ढोल-नगाड्यासह भांगडा करत कलावंतांनी सभागृहात उपस्थित रसिरांची मने जिंकली. त्यानंतर पारंपरिक खेळांचा रंगतदार प्रवास सुरू झाला अन् विदेशी पाहुणे खेळांमध्ये रंगून गेले. मुला-मुलींनी रोप मल्लखांबवर मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण करून पाहुण्यांना अवाक् केले. श्रावण महिन्यात साजरा होणाऱ्या मंगळागौरी सोहळ्याचे दर्शन महिलांनी घडवले. फुगडी, नृत्य, नदीवरचे धुणे, पाणी भरणे आदी विविध प्रकारांचे दर्शन पाहुण्यांना घडल्यामुळे येथील पारंपरिक संस्कृतीचा पटच त्यांच्या डोळ्यांसमोरून उलगडला गेला. दोरीवरच्या उड्यांनी पारंपरिक खेळांचा समारोप करण्यात आला. या वेळी संपूर्ण सभागृह तुडुंब भरले होते. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त एचव्हीपीएमच्या अनंत क्रीडा सभागृहात असोसिएशन फॉर इंटरनॅशनल स्पोर्टस फॉर ऑल (ताफिसा) या संघटनेच्या भारतातील एकमेव केंद्राचे उद््घाटन शुक्रवारी (दि.५) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ताफिसाच्या उपाध्यक्ष वेस्ट इंडिजच्या कॉथरिन फोर्ड, डेन्मार्क येथील गिर्लेव्ह क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. फिन बर्गरेन, अस्फा मलेशियाचे उपाध्यक्ष प्रा. दातो सर्जितसिंग शेखोन, जर्मनीचे जीटीसीचे रॉल्फ डुगनफेल्ड, समालोचक पद्मश्री प्रा. रवि चतुर्वेदी, एचव्हीपीएमचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश सावदेकर, एचव्हीपीएमचे संचालक सुरेश देशपांडे, डीसीपीईचे प्राचार्य डॉ. एस. सी. शर्मा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. ए. बी. मराठे आदी मंचावर उपस्थित होते.