आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईने फुलली शहरातील कॉलेजेस; वाहतूक नियम तुडवले पायदळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दहावीचे ‘अग्निदिव्य’ पार केल्यानंतर महाविद्यालयाच्या उंबरठय़ावर तरुणाईने सोमवारी (ता. 28) पहिल्यांदा पाऊल ठेवले. निमित्त होते नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीचे. शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये सोमवारपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला.
गेल्या महिन्यापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होती. प्रक्रियेदरम्यान सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. त्यानंतरही विज्ञान शाखेकडे ओढा जास्त असल्याने एक हजार 183 विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे प्रवेशाची शेवटची फेरी आता चार ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सत्राची सुरुवात नियोजित होती. त्यानुसार, पहाटेच प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी कॅम्पसमध्ये दाखल झालेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा वेळ एकमेकांशी ओळखी करण्यात, क्लास रूम्सची माहिती, बैठक व्यवस्था, नवे मित्र-मैत्रीण बनवण्यात तसेच प्राध्यापकांशी परिचयात गेला. मात्र, त्यानंतरही अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी चार तासिका घेण्यात आल्या. अकरावीत प्रवेशानंतर महाविद्यालयातील पहिलाच दिवस. त्यातही महाविद्यायाला पोहोचायच्या घाईत तरुणाईपैकी अनेकांनी वाहतुकीचे नियम सर्रासपणे पायदळी तुडवले.
शहरात असलेल्या 50 महाविद्यालयांमध्ये सोमवारी (ता. 28) अकरावी, बारावीच्या नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. सुमारे दोन आठवड्यांपूर्वीपासून पदवी अभ्यासक्रमाच्या तासिका सुरू झाल्या होत्या. अशात सोमवारपासून ज्युनियर कॉलेज सुरू झाल्याने कॅम्पसमधील वर्दळीत चांगलीच भर पडली होती. कॉलेजमध्ये लवकरात लवकर पोहोचण्यासाठी अनेकांनी एकाच दुचाकीवर तीन जण, चार जण असा प्रवास केला. सोमवारी सकाळी सात ते साडेसातदरम्यान दुचाकीवर ट्रिपल सीट येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या बर्‍यापैकी दिसत होती. दुपारी महाविद्यालय संपल्यानंतरही अनेक जण वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडताना दिसले. त्या दरम्यान इर्विन चौक, शहर वाहतूक शाखेचे पश्चिम विभाग कार्यालय, पंचवटी चौक, गल्र्स हायस्कूल चौकात वाहतूक पोलिस तैनात असल्याने चौकापासून अलीकडे दुचाकीवरून तिसरा उतरवून द्यायचा, चौकातून पुढे निघायचे, असा प्रकार सर्रासपणे आढळला.