आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transport News In Marathi, Internal City Bus Issue At Amravati, Divya Marathi

शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महापालिकेला 64 नवीन बस मिळणार आहेत. दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. महापालिका आयुक्त अरुण डोंगरे या बैठकीला उपस्थित होते. शहर बसची संख्या वाढल्याने शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत निधीतून महापालिकेला बस प्राप्त होणार आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या कार्यशाळा विभागाकडून तयार केलेल्या प्रकल्पाला राज्याच्या नगर विकास मंत्रालयाने 13 जानेवारी रोजीच मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे उपसचिव पंकज कुमार यांच्याकडून महापालिकेला सहा फेब्रुवारी रोजी प्रकल्प सादर करण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते. सहसचिव एस. के. लोहिया यांच्यापुढे प्रकल्प मांडण्यात आला. त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात दिली.

शहरात दहा वर्षांपूर्वी शहर बससेवा प्रारंभ करण्यात आली. मात्र, ती आजही अनेक भागांमध्ये पोहोचली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनावर नगरसेवक तसेच राजकीय पक्षांचा दबाव वाढत होता. कंत्राटदाराकडूनही बसची संख्या वाढवण्याबाबत असर्मथता दर्शवली जात होती. शहर बस सेवेचे कंत्राट असलेल्या अंबा माल व प्रवासी वाहतूक संस्थेने करारनाम्यातील बस संख्यादेखील रस्त्यावर उतरवली नाही. त्यामुळे सध्या धावत असलेल्या बसनाच अतिरिक्त प्रवाशांचा भार वाहून न्यावा लागतो आहे.

अधिक नफा मिळत असल्याने केवळ दोनच मार्गावरच कंत्राटदारामार्फत बस धावतात. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. अशा स्थितीत जेएनएनयूआरएम अंतर्गत महापालिकेला प्राप्त होणार्‍या 64 बसमुळे शहरातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळेल.

फेर्‍यांमध्ये वाढ होण्याची शक्यता
कंत्राटदाराकडून चालवण्यात येणार्‍या बसच्या फेर्‍या अत्यंत कमी आहेत. रेल्वे गाड्यांच्या वेळेवर तर बडनेराहून बसणार्‍यांनीच बस फुल्ल होते. त्यामुळे पुढील थांब्यांवरील प्रवाशांना गर्दी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते. सकाळी 10 च्या सुमारास तर बडनेरा भागातील अनेक थांब्यांवर शहर बस थांबवली जात नाही. नवीन बस आल्यानंतर ही समस्या दूर होऊन फेर्‍या वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आठ कोटींचे आगार साकारणार
जेएनएनयूआरएम योजनेतून प्राप्त होणार्‍या बसची निगा राखण्यासाठी आठ कोटी रुपयांतून आगारदेखील साकारण्यात येणार आहे. बडनेरा येथील कोंडेश्वर मार्गावरील पूर्वीच्या मध्यवर्ती जकात नाका असलेल्या ठिकाणी शहर बस डेपो अस्तित्वात येणार असल्याची माहिती आहे. 64 बसच्या दृष्टीने वाहक, चालक आणि यांत्रिकी पदेदेखील भरली जाणार आहेत.