अमरावती- दारूची अवैधरीत्या वाहतूक किंवा तस्करी करण्यासाठी शहरातील एका व्यक्तीने अजब शक्कल लढवली. त्याने दारूची तस्करी करण्यासाठी दारूच्या बॉटल (पावट्या) अक्षरश: शरीराला गुंडाळून घेतल्या होत्या. मात्र, त्याची ही युक्ती पोलिसांनी हाणून पाडली. अंगाला दारूच्या पावट्या गुंडाळून घेऊन जाणा-या एकाला खोलापुरी गेट पोलिसांनी रविवारी महाजनपुऱ्यात रंगेहाथ पकडले.
गुलाब लक्ष्मणराव वाकोडे (रा. आनंदनगर, अमरावती) असे पोलिसांनी पकडलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. गुलाब वाकोडे रविवारी महाजनपुरा परिसरातून जात होता. खोलापुरी गेट पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली. त्या वेळी त्याच्या अंगाला दारूच्या पावट्या गंुडाळल्याचे पोलिसांना दिसले. त्याने अंगावर घालेल्या टी शर्टच्या खाली कमरेजवळ दारूच्या १५ पावट्या दुपट्ट्याने बांधून घेतल्या होत्या. त्याने त्या अशा पद्धतीने बांधल्या होत्या, की सर्वसामान्यरीत्या अशा ठिकाणी दारू असेल, याची शंका कुणालाही येऊ शकणे अशक्य होते. दारू तस्करीचा हा नवा फंडा पोलिसांनाही चक्रावून टाकणारा नवखाच होता. कारण यापूर्वी अमरावतीत तरी या पद्धतीने दारूची तस्करी करताना कोणाला पकडले नव्हते.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्याच्याकडून १५ पावट्या देशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई खोलापुरी गेटचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
तत्पूर्वी रविवारी सकाळी खोलापुरी गेट पोलिसांनीच सुधाकर तुळशीराम हरणे (रा. महाजनपुरा) याच्याकडून १८ देशी दारूच्या पावट्या जप्त केल्या आहेत.