आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावतीकर महिला धनुर्धरांचे राष्ट्रीय वर्चस्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : डावीकडून अनुजा महालक्ष्मे, उन्नती राऊत
अमरावती - टाटानगर(झारखंड) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची लयलूट केली. यात अमरावतीकर महिला धनुर्धरांनी वर्चस्वपूर्ण कामगिरी करून सुवर्णपदकासह तीन कांस्यपदके जिंकली.

या स्पर्धेत देशातील २१ राज्यांच्या संघांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्री समर्थ धनुर्विद्या अकादमीच्या अनुजा महालक्ष्मेने १७ वर्षांखालील मुलींच्या कम्पाउंड प्रकारात ५० मी. अंतरात ७२० पैकी ६४३ गुण प्राप्त करून कांस्यपदक पटकावले. त्याचप्रमाणे मिश्र सांघिक प्रकारात आंध्र प्रदेशवर मात करून अचूक लक्ष्यभेदासह सुवर्णपदक पटकावले. याशिवाय तिने मुलींच्या सांघिक गटात राज्याला कांस्यपदकाची कमाई केली. याआधीही अनुजाने विविध राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेत पदके जिंकली आहेत. अकादमीच्या उन्नती राऊतने ६० मी. अंतरावर अचूक तीर सोडून कांस्यपदक जिंकले. केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान पटकावणारी उन्नती ही अमरावतीची एकमेव खेळाडू आहे. तिने याआधीही राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. दोन्ही महिला धनुर्धरांची निवड भारतीय धनुर्विद्या महासंघाने आयोजित केलेल्या नॅशनल रँकिंग स्पर्धेसाठी झाली आहे. अनुजा ही स्कूल आॅफ स्काॅलर्सची विद्यार्थिनी असून, उन्नती ही श्री समर्थ हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. या दोघी श्री समर्थ धनुर्विद्या अकादमीचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात सराव करतात. त्यांनी यशाचे श्रेय आई, वडील, प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा, राज्य संघटना अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिले आहे.

यशस्वी धनुर्धरांचा ‘त्या’ चालवत अाहेत वारसा
अनुजा आणि उन्नती या दोन्ही अंबानगरीतील हुन्नरी धनुर्धर शहरातील धनुर्धरांचा यशस्वीपणे वारसा चालवत आहेत. यापैकी उन्नतीने तर गेल्या दोन वर्षांपासून राज्य, राष्ट्रीय रँकिंग तसेच राष्ट्रीय शालेय स्पर्धा अचूक तिरंदाजी अन् दमदार खेळांसह गाजवल्या आहेत. त्यामुळे साहजिकच तिच्याकडून भविष्यात सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. तिने यंदा चार स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं लुटली. ती रिकर्व्ह या प्रकारात खेळत असल्यामुळे तिला भारतीय संघाचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. तशीही ती आतापासूनच भारतीय धनुर्विद्या संघाची दरवाजे ठोठावत आहे. अनुजाही काही कमी नाही. प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात ती कम्पाउंंड प्रकारात दर्जेदार कामगिरी करून सातत्याने यश मिळवत आहे.

रिकर्व्ह प्रकारात उन्नती एकमेव खेळाडू
रिकर्व्हहा धनुर्विद्या जगतात लोकप्रिय क्रीडाप्रकार असून, आॅलिम्पिकमध्ये केवळ याच प्रकारात विविध अंतराच्या स्पर्धा होत असतात. केरळ येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून रिकर्व्ह या प्रकारासाठी निवड झालेली उन्नती ही एकमेव धनुर्धर होय. तिने याच प्रकारात अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.

कम्पाउंड प्रकारात अनुजा महालक्ष्मे आहे तज्ज्ञ
अनुजामहालक्ष्मे ही कम्पाउंड या प्रकारात तज्ज्ञ खेळाडू असून, तिने या प्रकारात आजवर चांगलेच यश संपादन केले आहे. या प्रकाराचा समावेश आशियाई क्रीडा स्पर्धेत असून, यंदा इंचोन आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या या खेळातील कम्पाउंड प्रकारातच भारताला सुवर्णपदक मिळाले. या खेळाचा अद्याप ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हायचा आहे.