अमरावती- मोबाईल आणि वीज ही आजची अत्यावश्यक गरज बनली आहे. ही गरज ओळखून संबंधित कंपन्यांनी दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणे सुरू केले आहे.
मोबाइलवरून वापरल्या जाणा-या इंटरनेटच्या दरांमध्ये सेल्यूलर कंपन्यांनी दरवाढ केल्याने तरूणाई हिरमुसली आहे. तर वीज बिलात यापुढे दोन टक्के एलबीटी लागू झाल्याने वीज ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.
हाती मोबाइल नाही आणि घरात वीज नाही असा व्यक्ती अमरावती शहरात शोधूनच सापडेल. बहुतांश मोबाइलधारक टूजी आणि थ्रीजी इंटरनेटचा वापर करतात. अलीकडेच सर्वच सेल्यूलर कंपन्यांनी क्रमाक्रमाने इंटरनेट वापराच्या दरात बऱ्यापैकी वाढ केली आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीज बिलात यापुढे लोकल बॉडी टॅक्स लागू होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे एखादा ग्राहक 100 रुपयांचे वीजबिल भरत असेल तर त्याला आता या 100 रुपयांवर दोन टक्के कर भरावा लागणार आहे. सेवाकर, शिक्षण शुल्क कराच्या रुपामध्ये आधीपासूनच लागू असलेल्या करांव्यतिरिक्त एलबीटी म्हणून जास्तीचा कर वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहे.
हा कर मनपाने लावलेला
एलबीटीहा महावितरणने लावलेला कर नसून तो महापालिकेने लावला आहे. मनपाने हा कर रद्द केल्यास तो वीज बिलातून काढून टाकला जाईल. दिलीपघुगल, अधीक्षकअभियंता, महावितरण कंपनी.