आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणे अकरा लाखांनी गंडा; मागितली खंडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलगणेडीवाल ले-आउटमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या मुलींसोबत परिचित असलेल्या एकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शंभर कोटी बक्षिसांचे आमिष दाखवून तब्बल दहा लाख ७० हजार रुपये घेतले; तसेच युवतींच्या वडिलांना पाच लाखांची खंडणीही मागितली. या प्रकरणी युवतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

करण मुन्नालाल चौरागडे (२०, रा. कल्याणनगर) आणि शुभम राजेश अग्रवाल (२०, रा. मोतीनगर, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. गणेडीवाल ले-आउटमधील एका कुटुंबासोबत करणचा संपर्क होता. एक वर्षापूर्वी त्याने याच कुटुंबातील दोन्ही मुलींना प्रशांतनगरच्या बगिच्यामध्ये बोलवले. या कुटुंबातील मोठी मुलगी एलएलबीच्या प्रथम वर्षाला, तर धाकटी गोल्डन किड्समध्ये बारावीला आहे. या दोघी गेल्यानंतर करणने त्यांना सांगितले, की ‘हिटलर यूथ ब्रँड अवार्ड’ ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर जगातून प्रथम आल्यास पाचशे कोटी आणि देशातून प्रथम आल्यास शंभर कोटी रुपयांचे बक्षीस आहे. तुम्ही दोघीही अभ्यासामध्ये हुशार आहात. ही परीक्षा द्या. त्यानंतर कारमध्ये आलेल्या एका व्यक्तीने दोघींची प्राथमिक परीक्षा असल्याचे सांगत दहा प्रश्नांचा एक पेपर त्यांना सोडवण्यासाठी दिला. यामध्ये धाकटी उत्तीर्ण झाली आणि मोठी अनुत्तीर्ण झाली. धाकटी उत्तीर्ण झाल्यामुळे यापुढील काळात सर्व परीक्षा या ऑनलाइन होतील. त्यासाठी ‘नेव्हर बुल्ट’वर अकाउंट उघडण्याचा सल्ला करणने मुलीला दिला.

या परीक्षेमध्ये हिटलरच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तू हिटलरच्या जीवनावर अभ्यास कर. ही कंपनी अमेरिकन आहे. शिवाय यामध्ये बराक ओबामा यांच्या कार्यालयात काम करणारा मि. बुल्ट नामक व्यक्तीही सहभागी आहे. निवडक देशांमधील हुशार विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये होतो. त्यामध्ये तुझा समावेश झाल्याचे करणने मुलीला सांगितले. याचदरम्यान करणने वर्षभरात त्या युवती तिच्या वडिलांकडून ४४ वेळा २००, ३००, ५००, १०००, लाख, दीड लाख अशा पद्धतीने दहा लाख ७० हजार ६३० रुपये नगदी स्वरूपात घेतले. या वेळी सर्वांत मोठी रक्कम तीन लाख ६० हजार रुपये घेतली आहे. वर्ष झाल्यानंतरही बक्षिसाची रक्कम हातात आल्यामुळे त्यांनी रक्कम देणे बंद केले. तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न करून द्या; अन्यथा तिला मी मारून टाकेल, अशी धमकी यानंतर करणने मुलीच्या वडिलांना दिली; तसेच मला पाच लाख रुपयांची खंडणी द्या, असे मॅसेज त्याने मोबाइलवरून पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्रकरणाच्या मुळाशी जाणार
दोनजणांना या फसवणूक खंडणी प्रकरणात अटक केली आहे. युवतीला १०० कोटींचे बक्षीस लागल्याचे सांगून दहा लाख ७० हजारांनी फसवणूक केली; तसेच तिच्‍या वडिलांना मॅसेज करून मुलीशी लग्न करतो, अन्यथा तिला मारून टाकणार नाही तर पाच लाखांची खंडणी द्या, असे सांगितले. ही मोठी टोळी असल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आम्ही तपास करणार आहोत. नागरिकांनीही व्यवहार करताना सतर्क राहावे. सोमनाथघार्गे, पोलिसउपायुक्त.
ओबामांच्या कार्यालयाशी संपर्क
यापरीक्षेचे संचालन अमेरिकेतील बराक ओबामा यांच्या कार्यालयातील मि. बुल्ट करतात. तू अनेक परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस, असे सांगत करणने अमेरिकेतील मि. बुल्टसोबत मुलीचे बोलणे करून दिले. मि. बुल्ट म्हणून शुभम बोलला. शुभम हा बी.कॉम.चा तर करण हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. बुल्टनेसुद्धा तू शंभर कोटी रुपये जिंकल्याचे या युवतीला सांगून फोनवरून अभिनंदन केले होते.
तक्रारीनंतर युवतीवर झाला हल्ला
मंगळवारीरात्री तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी सकाळी त्याच युवतीवर (ज्या युवतीला बक्षीस लागल्याची बतावणी करण्यात आली आहे.) अज्ञात तीन हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात ही घटना झाली आहे. या वेळी हल्लेखोरांनी तोंडही दाबले, असे त्या युवतीने बुधवारी सकाळी गाडगेनगर पोलिसांना सांगितले आहे. या प्रकारामुळे घटनेतील गांभीर्य आणखीनच वाढले आहे.
पार्टी करा, सॅटेलाइट रेकॉर्डिंग होणार
हीयुवती देशातून प्रथम आली आहे; पण कंपनी बक्षीस देण्यापूर्वी विजेत्या युवतीमधील अन्य गुणसुद्धा पाहणार आहेत. त्यामुळे आपण एक जंगी पार्टी करा. त्यामध्ये नातेवाइकांना बोलवा, असे सांगण्यात आले. शंभर कोटींच्या आशेने युवतीच्या वडिलांनी पार्टी केली. या पार्टीचे रेकॉर्डिंग कंपनी सॅटेलाइटद्वारे करेल आणि अमेरिकेत असलेले मि. बुल्ट पाहतील, असे सांगितले. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी पार्टी झाली. मात्र, त्या पार्टीमध्ये करण नव्हता. त्याने शहरात आल्यानंतर पुन्हा पार्टी करण्यास सांगितले आणि युवतीने दोन गाण्यांवर माझ्यासोबत नृत्य करावे, असे सांगितले. त्यामुळे पुन्हा पार्टी झाली, ती युवती करणसोबत नाचली आणि या पार्टीचे सॅटेलाइट रेकार्डिंग झाले, असेही करणने सांगितले होते. यानंतरही रक्कम मिळाली नाही.