आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Amaravati, Sleet

महायुतीचे सरकार आल्यास कर्जमाफी; उद्धव ठाकरे यांची अमरावतीत घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- ‘गारपिटीमुळे राज्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकर्‍यांची सारी मदार आता शासनाच्या पॅकेजवर अवलंबून आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी श्रेयाचे राजकारण न करता, सर्वपक्षीय नेत्यांनी एक होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,’ अशी साद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घातली. तसेच राज्यात महायुतीचे सरकार आल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ, अशी घोषणा त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या विदर्भातील पहिल्याच सभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राज्यातील शेतकर्‍यांची दैन्यावस्था झालेली असताना, एरवी कधीही न दिसणारे नेते जागोजागी भेटी देताना दिसत आहेत. या कोरड्या भेटींना काहीच अर्थ नाही. शासनाला शेतकर्‍यांबाबत खरी आत्मीयता असेल, तर शासनाने आधी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे, पीक कर्जाचे त्वरित वाटप केले जावे’, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

गडकरी आमचे शत्रू नाहीत
‘भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे ‘मातोश्री’वर अस्वस्थता होती? युतीत तणाव निर्माण झाला होता काय?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, अस्वस्थतेचे काही कारण नाही. गडकरी हे दुश्मन नव्हे, महायुतीचे नेते आहेत. महायुतीची रणनीती ठरवल्यानंतर कोणी त्याला फाटे फोडत असेल, तर अशी धारणा असणे स्वाभाविकच आहे.

मनसेचा प्रभाव नाही : आठवले
देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. शिवसैनिक-भीमसैनिकांसोबत भाजप व शेतकरी संघटना महायुतीत असल्याने मनसेचा प्रभाव पडणार नाही. मराठी मतांचे विभाजन आता होणार नाही. महायुतीच्या विरोधात मनसेचा उमेदवार जिंकणारच नाही. किंबहुना त्याचा महायुतीला फारसा फरकही पडणार नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

मदत न दिल्यास आंदोलन
शासनाने शेतकर्‍यांना त्वरित मदत न दिल्यास शिवसैनिक व भीमसैनिक रस्त्यावर उतरून ‘सेना स्टाइल’ आंदोलन करतील. राज्य शासन ज्या पद्धतीने उद्योगांना झुकते माप देते, त्याप्रमाणेच कास्तकारांनाही झुकते माप देत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.