आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • University Give Environment Award To Hvyapra Board

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हव्याप्र मंडळाला विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून दिला जाणारा ‘पर्यावरण पुरस्कार २०१४’ अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला दिला जाणार आहे. निवड समितीने केलेली शिवाजी कृषी महाविद्यालयाची शिफारस नाकारत दुस-या क्रमांकावरील हव्याप्र मंडळाला हा पुरस्कार देण्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून गुरुवारी, फेब्रुवारीला शिक्कामोर्तब झाले. शिवाजी कृषी महाविद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित नसल्याचे कारण पुढे करीत संस्था तपासणीवर व्यवस्थापन परिषदेत वादळी चर्चा झाली.
विद्यापीठाच्या पर्यावरण पुरस्काराबाबत दोन नामांकित शैक्षणिक संस्थांत वाद निर्माण झाला होता. पर्यावरण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष भडांगे हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अकोला येथील शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. तर पुरस्काराच्या शर्यतीतील हव्याप्र मंडळाच्या सचिव प्रा. माधुरी चेंडके यांनी पत्र देत पुरस्कार कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत कुलगुरूंना विनंती केली होती. तीन अर्जांमधून पाच सदस्यीय निवड समितीकडून अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयाची पर्यावरण पुरस्कारासाठी शिफारस केली होती. स्पर्धेत अमरावतीचे हव्याप्र मंडळ, अकोल्याचे श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय होते. निवड समितीकडून गुणवत्तेच्या क्रमवारीनुसार शिवाजी कृषी महाविद्यालयाला प्रथम, हव्याप्र मंडळाला द्वितीय तर अकोल्यातील शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे नामांकन दिले होते. डिसेंबर १४ रोजी राष्ट्रीय प्रदूषण दिनी पुरस्कारांचे वितरण करणे अपेक्षित होते. मात्र, कार्यक्रमाला काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. माधुरी चेंडके यांनी दिलेल्या पत्रामुळे कुलगुरूंवर पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याची वेळ आली. शिवाजी कृषी महाविद्यालय हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित नसल्याने पुरस्कार देता येणार नाही, असा मतप्रवाह व्यवस्थापन परिषदेत समोर आला. पुरस्कार वितरित करण्याचा दिवस निघून गेल्यानंतर हा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर चर्चेसाठी आला.

संस्था गटामध्ये निवड
संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे देण्यात येणा-या पर्यावरण पुरस्कारासाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची संस्था गटात निवड केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चेनंतर पुरस्काराबाबत निर्णय घेतला. व्यवस्थापन परिषदेने पुरस्कार वितरणाबाबत अधिकार दिले आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्याबाबत नियोजन केले जात आहे. डॉ.मोहन खेडकर, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

काय होता वाद
वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धनात उत्कृष्ट कार्य करणारे महाविद्यालय, संस्था, स्वायत्त संस्था व्यक्तींना पर्यावरण पुरस्कार विद्यापीठाकडून दिला जातो. संस्था गटात तीन अर्ज प्राप्त झाले होते . त्यात श्री शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत महाविद्यालयांचे दोन, तिसरा अर्ज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने सादर केला होता. शिवाजी कृषी महाविद्यालयाची शिफारस केल्याने हा वाद निर्माण झाला होता.