आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे होणे शक्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला, ते वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. चांदूर बाजारपासून मोर्शी मार्गावर नऊ किलोमीटरवर रिद्धपूर आहे. महानुभाव संप्रदायाचे रिद्धपूर तीर्थस्थान आहे.
महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली. महानुभाव पंथाचे नागदेवाचार्य, म्हाइंभट्ट, केशिराज व्यास, महदाईसा यांनी पंथाचा विचार पुढे नेला. त्याचदरम्यान लीळाचरित्र, सिद्धांतसुत्रे, सूत्रपाठ, दृष्टांत, प्रमेय-ग्रंथ अशी महानुभाव पंथाची ग्रंथसंपदा निर्माण झाली. आद्य कवयित्री महदाईसांंनी येथे धवळे रचले. शिशूपाल वध, रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचानाही येथेच रचल्या. मराठीची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या रिद्धपूरला खऱ्या अर्थाने मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना का होऊ नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी भाषेची सद्य:स्थिती,मराठी भाषाविषयक धोरणाची उद्दिष्टे या दोहोंच्या प्रकाशात भाषेचे २५ वर्षांचे धोरण निश्चित करण्याचे शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने मराठी भाषा विकासाचे धोरण (मसुदा २०१४) राज्यासमोर ठेवले आहे. या धोरणावर शासनाच्या मराठी भाषा विभागाने शिफारशी, हरकती सूचना मागवल्या आहेत. २५ वर्षांसाठी मराठी भाषेचे धोरण निश्चित करताना मराठी भाषा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे प्रस्तावित मसुद्यात नमूद केलेे. जागतिकीकरणाचे मराठी भाषेवरील परिणाम, भविष्यातील आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठ स्थापन होणे महत्त्वपूर्ण आहे. धोरण निश्चितीनंतर विद्यापीठाच्या गठणाबाबत शासनाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. हिंदी भाषेचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची निर्मिती केली. रामटेक येथे संस्कृत भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांत त्या-त्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना झाली.
मराठी भाषकांसाठी रोजगार निर्मिती करू शकतील, असे अभ्यासक्रम असतील. इतर अकृषी विद्यापीठाशी समकक्ष राज्यपालांच्या अखत्यारित असावे. विद्यापीठाचे स्वरूप परिसर (कॅम्पस युनिव्हर्सिटी) असे असावे,विद्यापीठाची उभारणी ५०० एकरावर करण्याची शिफारस केली आहे.

मसुद्यात उल्लेख
सल्लागारसमितीतर्फे शासनास सादर मराठी भाषा धोरण २०१४ मसुद्यात विद्यापीठाच्या बाबींचा उल्लेख आहे. विद्यापीठाचे काम चार प्रकारे अपेक्षित असून, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक समावेश आहे. विद्यापीठाचा कारभार मराठीत देवनागरी लिपीत करण्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाच्या रचनेबाबत मसुद्यात माहिती दिली.
सर्वांगीण विकास हवा
मराठीही राज्याची राजभाषा होऊन अर्धशतकावर कालावधी झाला, भाषेचे विद्यापीठ स्थापन केले नाही. ही उणीव भरून काढणे, मराठीच्या विकासासाठी मराठीचे विद्यापीठ स्थापनेबाबत शिफारस केली. विद्यापीठ स्थापनेसाठी मराठी भाषा विद्यापीठ कायदा तयार करावा, त्यानुसार विद्यापीठ अस्तित्वात यावे, अशी शिफारस केली आहे.