आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: पीडीएमसी गुणवाढ प्रकरणाची विद्यापीठ करणार चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिन्यांपूर्वी पाच विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षेत केलेल्या गुणवाढ प्रकरणाची आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने तीन सदस्यीय समिती नेमली असून, ही समिती उद्या, मंगळवारी महाविद्यालयात येत आहे. हे गुणवाढ प्रकरण सर्वप्रथम ‘दिव्य मराठीने' उघडकीस आणल्यानंतर अधिष्ठात्यांनी यापूर्वी महाविद्यालयीनपातळीवर चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध कारवाई केली आहे, हे येथे उल्लेखनीय.
पीडीएमसीमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाला शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाविद्यालयातील अंतर्गत परीक्षेत एका विषयात गुणवाढ केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी अधिष्ठात्यांनी चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध कारवाई केली आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या चौकशीमध्ये नागपूर येथील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे. ही समिती मंगळवारी अमरावतीत येणार असून, पीडीएमसीमधील अंतर्गत गुणवाढ प्रकरणाची चौकशी करणार आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडीएमसीमध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये प्रथम वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांनी अॅनॉटॉमी विषयाच्या उत्तरपत्रिकेमध्ये गुणवाढ केल्याची बाब महाविद्यालयातील प्राध्यापकांपुढे आली होती. त्या प्राध्यापकांनी अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीवरून डॉ. जाणे यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीने अहवाल दिल्यानंतर अधिष्ठाता जाणे यांनी दोषी आढळलेल्या पाच विद्यार्थ्यांसोबत दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मंगळवारपासून (दि.१६) विद्यापीठाची त्रिसदस्यीय समिती अमरावतीत दाखल होणार असल्याचे नाशिक आरोग्य विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले आहे.