आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Untrained Nurse, Medical Atendant Issue At Amravait

आयएमएला जुमानेनात काही डॉक्टर, रुग्णालयांमध्ये अप्रशिक्षित नर्स, अटेन्डंट कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- वैद्यकीय शिक्षणाचा गंध नसलेल्या व्यक्ती रुग्णालयांमध्ये नर्स आणि मेडिकल अटेन्डंट म्हणून कायमच आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याची गंभीरपणे दखल घेतली. मात्र, त्यांनी दिलेल्या इशार्‍यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

आयएमएच्या सलग दोन बैठकींमध्ये या मुद्दय़ावर चर्चा झाली. त्यानंतर अप्रशिक्षित व्यक्तींना इंजेक्शन, सलाइन टोचण्याची, रुग्णांचे रक्त काढण्याची, कॅथेटर, ऑक्सीजन लावण्याची परवानगी देऊ नका. अशा कर्मचार्‍यांची दवाखान्यातील रिसेप्शन किंवा अन्य अवैद्यकीय कामांवर नेमणूक करा, अशी सक्त सूचना आयएमएचे अमरावती शाखाध्यक्ष डॉ. ए. टी. देशमुख यांनी दोनदा डॉक्टरांना दिली होती. परंतु, त्यानंतरही काही डॉक्टरांनी आपल्याच संघटनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आयएमएची सूचना आणि कायदा पायदळी तुडवत काही रुग्णालयांमध्ये अद्यापही अप्रशिक्षित लोकच रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.

एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍याने एका रुग्णालयामध्ये नुकतीच धडक दिली. त्यावेळी त्या रुग्णालयात तीन मुलं, मुली रुग्णांना सलाइन टोचताना आढळल्या. ‘दिव्य मराठी’ने सोमवारी शहरातील काही रुग्णालयांमध्ये पुन्हा आढावा घेतला. त्यावेळी रुक्मिणीनगरातील काही दवाखान्यांमध्ये ‘जैसे थे’ स्थिती दिसून आली. राजापेठ येथील दोन रुग्णालयांमध्येही हीच स्थिती होती. राजापेठमधील एका दवाखान्यात ‘दिव्य मराठी’च्या टीमला एक युवक रुग्णाचे रक्त तपासणीसाठी काढताना आढळला. त्याच्याजवळ एएनएम, जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग अशी कोणतीही पदवी नसून, तो बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे त्याने स्पष्ट केले.

काही रुग्णालयांत हे प्रकार सुरू
काही रुग्णालयांमध्ये असे अप्रशिक्षित लोक कार्यरत आहेत. हा प्रकार गुन्हा आहे, ही बाब यापूर्वीच अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी स्पष्ट केली. आयएमएनेदेखील या डॉक्टरांना दोनदा सूचना दिली आहे. त्यानंतरही आयएमएची सूचना आणि कायदा काही जणांकडून मोडला जात असून, याबाबत आता आयएमए कोणती भूमिका घेणार, याकडे सार्‍या अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

अद्यापही मोडला जातोय कायदा
एएनएम, जीएनएम, बी.एस्सी. नर्सिंग असे व्यावसायिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नर्स किंवा मेडिकल अटेन्डंट म्हणून नेमणूक दिल्यास त्यांना जादा वेतन द्यावे लागते. असे प्रशिक्षित लोक किमान पाच हजार ते 15 हजार वेतन घेतात. त्याऐवजी दहावी, बारावी, आयटीआय झालेली अप्रशिक्षित व्यक्ती हॉस्पिटलमध्ये नेमली, तर तो अडीच ते तीन हजार रुपये दरमहा वेतन घेते. अशी अप्रशिक्षित व्यक्ती नेमणे डॉक्टरांना परवडत असल्याने सर्रास कायदा मोडला जात आहे.

धोक्याची सूचना देणे एवढेच आमचे काम
डॉक्टरांना आम्ही दोनदा सांगितले आहे. संघटना म्हणून आम्ही त्यांना धोका लक्षात आणून दिला आहे. आयएमएलादेखील र्मयादा आहेत. त्यांना कारवाईचे अधिकार नाही. वारंवार सूचना देऊनही डॉक्टर सावध होत नसतील, तर संभाव्य संकटाला जो-तो व्यक्तिश: जबाबदार असेल. डॉ. ए.टी. देशमुख, अध्यक्ष, आयएमए.