आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्‍हाडी कलाकारांनी स्व-वर्गणीतून साकारला ‘छावा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जनमानसात पोहोचावे, यासाठी मायमराठी स्वाती नाट्यकला अकादमीच्या कलाकारांनी ‘छावा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 15 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयाच्या सभागृहात या चित्रपटाचे लोकार्पण होणार आहे.

चंद्रशेखर तरारे दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट अस्सल वर्‍हाडी भाषेत असून, विदर्भातील ऐतिहासिक स्थळे, जुनी ग्रंथालये, निसर्ग सौंदर्य, मानवी जीवन व बोलीतील वेगळेपणा आदी विषयांवर चित्रीकरण करण्यात आले आहे. संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातून लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या विचारांचा प्रभाव जनमानसात टिकून राहावा, या उद्देशाने चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. अकादमीच्या कलाकारांनी स्वत: वर्गणी गोळा करून चित्रपटासाठी निधी जमवला आहे. निर्मितीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, कला आणि विचारांच्या शक्तीने स्वस्थ बसू दिले नसल्याचे कलाकारांनी स्पष्ट केले आहे. महेश तरारे आणि आशीष वासनिक यांनी सहदिग्दर्शकाची कामगिरी बजावली. संवाद माही मयूर यांनी लिहिले, तर धीरज ढोके व अक्षय वासनिक यांनी प्रकाश योजनेचे काम पाहिले आहे. मोर्शी, चांदूरबाजार व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

15 ऑक्टोबरला होणार्‍या लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे अध्यक्षस्थानी असतील. जनसंग्रामचे कार्याध्यक्ष शेखर भोयर प्रमुख पाहुणे असतील. भास्करराव टोम्पे, अरविंद गावंडे, मनोहर सुने, प्रशांत डहाणे, सरिता बर्वे, वंदना चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची या वेळी उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘छावा’ टीमने केले आहे.