आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काला पहाड’, ‘बेल्या’, ‘रायत्या’ आला बाजारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील बाजारपेठेत सध्या ग्रामीण भागातील शेतकरी गावरान आंबे विक्रीसाठी घेऊन येत आहेत. चित्रा चौक, राजापेठ, गाडगेनगर, गांधी चौक परिसरातील शेतकऱ्यांकडे सध्या आंबे खरेदीसाठी अमरावतीकरांची वर्दळ पहायला मिळत आहे. ‘काला पहाड’, ‘बेल्या’, ‘रायत्या’ आदी गावरान आंब्याच्या जाती सध्या किरकोळ प्रमाणात बाजारात दिसून येत आहेत, तर इतर जाती दुर्मिळ आहेत.

जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांशी संवाद साधून दिव्य मराठीने गावरान आंब्यांची प्रचलीत नावे वैशिष्ट्यांबाबत माहिती घेतली. गावरान आंब्यांच्या अनेक जाती सध्या दुर्मिळ झाल्याचे शेतकरी सांगतात. सध्या मोजक्याच जातीचे आंबे बाजारात दाखल झाले असून त्यांचीही आवक कमी आहे. ६० ते १०० रुपये किलो या दरात विविध जातीचे आंबे मिळत आहेत.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या गावरान आंब्यांना दरवर्षी नागरिकांची मागणी असते. मात्र गावरान आंब्यांची झाडंच सध्या जास्त प्रमाणात शिल्लक नसल्याने आंबे दुर्मिळ झाल्याचे शेतकरी सांगतात. पूर्वी गावरान आंबे सर्रास मिळत असत. मात्र वृक्षतोडीला बळी पडलेल्या आंब्यांच्या झाडांमुळे गावरान आंबे दुर्मिळ झाले आहेत. शेतात शिल्लक असलेल्या झाडांची मधूर फळे सध्या शेतकरी शहरात विक्रीसाठी आणत आहेत. वाळलेल्या गवतात साठवून ठेवलेल्या आंब्यांच्या टोपल्या सध्या नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. गावरान आंब्यांना चांगली मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात गावरान आंब्यांच्या विविध जाती बाजारात दाखल होतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गारपिटीची फटका, उत्पादन कमी
विदर्भात विविध प्रकारातील गावरान आंबे पिकतात. मात्र पुर्वी प्रमाणे झाडे शिल्लक नसल्याने उत्पादन कमी होते. अक्षय तृतीयेनंतर गावरान आंबे बाजारात दिसतात. मात्र यंदा गारपिटीची फटका बसल्याने उत्पादन कमी आहे. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला विशेष मागणी असते.
- रमेश आठोले, शेतकरी

आंब्याची नावे आणि वैशिष्ट्ये -
-‘आंबील’: हा आंबा चापट आणि लांब असतो
-‘सयद्या’: मधासारखा गोड चव असलेला हा आंबा आहे.
-‘बेल्या’: काही प्रमाणात बेलासारखा सुगंध असलेला आंबा.
-‘लाडू’: लड्डूसारखा गोल,आठोळी लहान असलेला आंबा.
-‘शेवली’: हा आंबा लालसर आणि रस पांढरा असतो.
-‘गोलटी’: अत्यंत लहान आकाराचा गाेल आंबा.
-‘दसाड्या’: या आंब्याच्या गरात जाडसर दशा असतात.
-‘रायत्या’: प्रामुख्याने लोणच्यासाठी वापरला जाणारा कच्चा आंबा.
-‘शेंदऱ्या’: शेंड्यावर शेंदरा ठिपका शेंदरा रस असलेला आंबा.
-‘काला पहाड’: शेंड्यावर आणि देठाजवळ काळसर, पहाड पट्टीत येणारा आंबा.
(टिप : वरील आंब्यांची नावे ही ग्रामीण भागात प्रचलीत असून ती शेतकऱ्यांनी सांगितली आहेत.)
बातम्या आणखी आहेत...