आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीकरांचा दररोज तीन टन हिरव्या भाज्यांवर ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिनाभरापासून भाजीबाजारात हिरव्या भाज्यांची रेलचेल असल्याने आणि दर आटोक्यात असल्याने भाजीविक्रेत्यांचे स्टॉल हिरवाईने टवटवीत झाले आहेत. अमरावती शहर व परिसरातून दरदिवशी तीन टन हिरव्या भाज्यांची मागणी असते. त्यासाठी दररोज दोन टन पालक आणि एक टन मेथी बाजारात दाखल होत आहे.
कृषिउत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात जिल्हाभरातील शेतकरी ठोक विक्रीसाठी भाजीपाला आणत आहेत. योग्य वातावरण असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये पालक 26 रुपये, तर मेथीची विक्री 14 रुपये दराने व्हायची. आता मेथी व पालकाचे दर अनुक्रमे पाच व सात रुपये प्रतिकिलो एवढे घसरले आहेत. पाच महिन्यांपूर्वी शहरात एक ते दीड टन हिरवा भाजीपाला येत होता. सध्या इतवारा बाजार, राजापेठ, गाडगेनगर व शहरातील विविध बाजारात हिरव्या भाज्यांची आवक दुपटीने वाढली आहे. मागणीही दमदार आहे. परिसरातील ग्रामीण भागातही शहरातून भाजी पोहोचत आहे. एकाएकी दर कोसळल्याने भाजीपाला उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
झळ सोसावी लागत आहे
दर कोसळल्याने झळ सोसावी लागत आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र अधिक असल्यास उत्पन्न बरे मिळते. जानेवारीनंतर भाव वाढण्याची शक्यता आहे.
अमोल गावंडे, शेतकरी.
पालकातून प्राप्त होणारे ‘अ’ जीवनसत्त्व, लोह फायद्याचे
पालकमधून ‘अ’ जीवनसत्व आणी लोह मिळते. इतर पोषक घटक आणि लोह मिळवण्यासाठी मेथीही गुणकारी आहे. भाज्या बनवताना काळजी घेणे आवश्यक असते. भाज्या जास्त वेळ कापून ठेवू नयेत. त्यामुळे पोषक घटक नष्ट होतात. भाज्या धुताना पाण्याचे प्रमाण जास्त असावे. डॉ. सुजाता सबाने, प्राध्यापिका, गृहअर्थशास्त्र विभाग, र्शी शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय.