आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीत भाजीपाला सामान्यांच्या आवाक्यात; गर्दी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सणासुदीच्या दिवसांत भाज्या सरासरी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दरावर घसरल्याने सामान्यांच्या आवाक्यात आल्या. कांदा, अद्रक, लसूण मात्र अजूनही तेजीत आहेत. कांदा किरकोळ बाजारात 50 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने किरकोळ बाजारात दर घसरले आहेत.

सध्या गणेशोत्सव, महालक्ष्मी आगमन असे सणासुदीचे दिवस आहेत. महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात भाजीपाल्यासह कांद्याचे दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलोवर गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी भाज्या खरेदी करताना हात आखडता घेतला होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने सरासरी दरही घसरून 30 ते 40 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने बाजारात आवक मंदावली होती. सध्या पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली. त्यामुळे दर घसरले आहेत.

आता नफा कमी झाला
भाव घसरल्यामुळे व्यवसायात फारसा नफा दिसत नाही. महिनाभरापूर्वी भाव तेजीत असल्यामुळे ग्राहक फटकत नव्हता. आता ग्राहक वाढले, तर नफा कमी झाला आहे. विवेक चव्हाण, किरकोळ विक्रेता.

भाज्या 30 ते 40 रुपये किलो असल्या तरी सध्या त्यांचे भाव आवाक्यात आहेत. सणासुदीच्या दिवसांत भाव महिनाभरा पूर्वीसारखे राहिले असते, तर पंचाईत झाली असती. मात्र असे भाव स्थिर असावे. मनोरमा मेटकर, सर्मपण कॉलनी.

कांद्याची आवक ‘जैसे थे’ : ठोक बाजारात सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेलेला कांदा मंगळवारी 3500 रुपये ते 5000 दराने विकला गेला. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 35 रुपयांपासून 50 रुपये किलो होते. ठोक बाजारात कांद्याची 10 टन आवक झाली.