अमरावती- अपयशही यशाची पहिली पायरी आहे. अपयश येईल या भीतीने खचून जाता यशप्राप्तीसाठी प्रयत्नवादी राहा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उच्चतम लक्ष्य समोर ठेवल्यास यश निश्चितपणे प्राप्त होऊ शकते. अधिकाधिक युवकांनी असा प्रयत्न केल्यास भारत निश्चित महासत्ता होईल,’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले.
विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तथा यूपीएससी परीक्षा कोचिंग सेंटरच्या वतीने भारतीय संरक्षण विभागात पदभरती संदर्भात स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना कुलगुरू बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून कर्नल रोहीत तिवारी (पुणे), कर्नल सुभाष पॉल (जम्मू काश्मीर), कॅप्टन सुमिषा शंकर (मुंबई), बीसीयूडीचे संचालक डॉ. अजय देशमुख, प्राचार्य डॉ. आर. ए. उमेकर, डॉ. एस. के. ओमनवार उपस्थित होते.
‘करिअर अपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स फोर्सेस अॅज ऑफिसर्स’ या विषयावर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांनी देशासाठी समर्पित भावनेने काहीतरी करावयाचे आहे, असा दृढ निश्चय मनाशी ठेवून, त्या दृष्टीने योग्य प्रयत्न केल्यास संरक्षण विभागामध्ये काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. प्राचार्य डॉ. उमेकर यांच्या प्रयत्नामुळे विद्यापीठाला अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाली.आमच्या विद्यार्थ्यांनी त्या संधीचा फायदा घेऊन सोने करावे, असे मत बीसीयूडीचे संचालक प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. उमेकर यांनी सांगितले की, विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे आजवर 123 जणांना रोजगार मिळाला आहे. सुमारे दोन हजार 500 जणांनी केंद्रातून मार्गदर्शन घेतले आहे. कर्नल रोहित तिवारी, कर्नल सुभाष पॉल, कॅप्टन सुमिषा शंकर यांनी ‘करिअर अपॉर्च्युनिटी इन डिफेन्स फोर्सेस अॅज ऑफिसर्स’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.