आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Victim Of Fire Helpless Issue At Amravati, Divya Marathi

आगपीडितांच्या मदतीसाठी गावकर्‍यांनी घेतला पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी - तालुक्यातील गावंडगाव येथे रविवारी (दि. 25) पहाटे शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या भीषण आगीत नागरिकांच्या डोळ्यांदेखत 14 घरांची राखरांगोळी झाली. बेघर झालेल्या या आगपीडितांना शेजार्‍यांनी आपल्या घरी विनाअट आश्रय देऊन ‘शेजारधर्मा’चा परिचय दिला.

रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेली आग अग्निशमन विभाग तसेच नागरिकांच्या मदतीने पहाटे सात वाजता आटोक्यात आली. विजेच्या खांबावर झालेल्या शॉर्ट सर्कीटमुळे ठिणगी पडल्याने लागलेल्या आगीत ढोकणेपुरा परिसरातील चौदा घरे भस्मसात झाली. अशोक ढोकणे, दिलीप ढोकणे, मधुकर ढोकणे, बाळू ढोकणे, श्रीराम ढोकणे, दादाराव ढोकणे, विनायकराव ढोकणे, गजानन चापके, विष्णू चापके, रामदास मारबते, अशोक ढोकणे, नारायण ढोकणे, विठ्ठल मारबते, वर्षा भोरे यांच्या घरातील भांडीकुंडी, कपडेलत्ते, अन्नधान्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. आगपीडितांशी असलेला सौहार्द व शेजारधर्म पाळून त्यांच्या जेवण्याची व राहण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांनी गावगाड्यातील संबंध जोपासले आहेत.या कुटुंबांना बळवंत वानखडे यांनी रविवारी प्रत्येकी एक हजार रुपये, सरपंच, सदस्यांनी दोन हजार, तर कपिल देशमुख यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत केली. आमदार अभिजित अडसूळ यांच्यामार्फत दहा कुटुंबीयांना प्रत्येकी सात टिन पुरवण्यात आले. नायब तहसीलदार विजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी गायकवाड आदींनी अन्न, धान्य उपलब्ध करून दिले होते.

सोमवारी तहसीलदार प्रदीप पवार यांनी सोमवारी गावंडगावला भेट देऊन आगपीडित कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला एक हजार रुपये रोख याप्रमाणे मदत दिली. आगपीडितांच्या मदतीसाठी भैय्यासाहेब देशमुख यांनी अंजनगावसुर्जी येथे मदत निधी संकलन फेरी काढली. या रकमेतून भांडीकुंडी व आवश्यक वस्तूंची खरेदी करून आगपीडितांना दिली जाणार आहे.