आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीसीएच्या टॅलेंट हंट तडाख्याने नेमके काय गवसले.!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेने (व्हीसीए) मागील दोन महिन्यांमध्ये 11 जिल्ह्यांमधून क्रिकेटपटू शोधण्यासाठी ‘टॅलेंट हंट’चा धडाका लावला आहे. दोन महिन्यांच्या अंतराने चार वयोगटांच्या निवड चाचण्या घेण्याची घाई व्हीसीएने केली. याआधी असे कधीही घडले नव्हते. या निवड चाचण्यांचा परिणाम म्हणावा तर शून्यच आहे.

एक तर निवड चाचण्या या 10 ते 15 दिवसांची पूर्वसूचना न देता घेण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना याची तयारी करता आली नाही. जिल्हा हौशी क्रिकेट संघटनांच्या नियमित खेळाडूंनाच निवड चाचणी देता आली. शहरातील इतर क्लब, तालुका व ग्रामीण भागातील खेळाडू वेळेवर माहिती न मिळाल्याने चाचणीपासून वंचित राहिले. अकराही जिल्ह्यांमध्ये चारही वयोगटांच्या निवड चाचण्या केवळ तीन ते चार तासांत आटोपण्यात आल्या. एवढय़ा कमी वेळात शेकडो खेळाडूंची प्रतिभा शोधण्याची अशक्यप्राय बाब व्हीसीएच्या निवडकर्त्यांना कशी साध्य झाली, ते तेच जाणोत. अनेक पालकांच्या यासंदर्भात तक्रारी आल्या आहेत.

वर्षानुवर्षे खेळाडू नेटमध्ये सराव करीत असतात. यात त्यांच्या पालकांचे योगदान तर सर्वाधिक असते. अशात उदयोन्मुख क्रिकेटपटूंची प्रतिभा व्हीसीएचे निवडकर्ते केवळ काही चेंडूंमध्ये कशी पारखतात, हे न उलगडणारे कोडे आहे. बीसीसीआयही एवढय़ा वेगाने खेळाडूंचा शोध घेत नसेल. अति तिथे माती होत असते, याची जाणीव सुजाण व्यक्तींचा भरणा असलेल्या संघटनेला असायलाच हवी. व्हीसीएने पालकाचा आणि तरुण खेळाडूंविषयीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

खुला गट
अमरावती, यवतमाळ, वर्धा हे एकत्रित तीन विभाग
100 च्या वर खेळाडूंची हजेरी
15 खेळाडूंची निवड
केवळ व्हीसीएच्या लीग खेळण्याची संधी

14 ते 19 वर्षे वयोगट
जिल्ह्यातून 105 खेळाडूंची हजेरी
अद्याप खेळाडूंची निवड नाही
अंतिम निवड व्हीसीए करेल.

13 वर्षांखालील
107 खेळाडूंची हजेरी
जिल्ह्यातून 14 खेळाडूंची निवड
दोन संघ खेळताहेत व्हीसीएची सुपरसिक्स लीग

19 वर्षांखालील
132 खेळाडूंची हजेरी
जिल्ह्यातून 15 खेळाडूंची निवड
अमेय भागवत विदर्भकडून खेळला