आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील पहिली ‘स्किल लॅब’ अमरावतीत सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गरोदरपणात तसेच प्रसूतीदरम्यान उद्भवणा-या विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भातील पहिली महाराष्ट्रातील दुसरी स्किल लॅब (कौशल्य प्रयोगशाळा) अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच मेळघाटसारख्या दुर्गम भागातील मातामृत्यू, बालमृत्यू तसेच कुपोषण आदी समस्यांवर मात करण्यासाठी स्किल लॅबमध्ये दिल्या जाणा-या प्रशिक्षणाचा विशेष फायदा होणार आहे.

दरम्यान, माता, नवजात बालके तसेच किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्य सेवांसंबंधी कौशल्यामध्ये कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे, हा या स्किल लॅबचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या सहाय्याने नक्की मात करता येईल, या दृष्टिकोनातून रुग्णालयात सुसज्ज अशी स्किल लॅब (कौशल्य प्रयोगशाळा) आकारास आली आहे. या स्किल लॅबचा फायदा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ आदी आरोग्य सेवेतील विविध घटकांना होणार आहे. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत तपासणीसाठी उपयोगी पडणा-या वैद्यकीय साधनसामग्रीचे प्रदर्शन स्किल लॅबमध्ये भरवले आहे. त्याद्वारे डॉक्टर तसेच नर्सिंग स्टाफला प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी माहिती फलक, विविध प्रकारचे मॉडेल आदींचा उपयोग करण्यात येणार आहे. या साहित्याबरोबरच प्रशिक्षणादरम्यान दृकश्राव्य माध्यमांचाही वापर करण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अधीक्षक डॉ. अरुण यादव तसेच वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना जामठे, अधिसेविका रूपमाला घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल लॅबमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

माता बालमृत्यूचे प्रमाण घटले
डिसेंबर२०१४ मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात ही स्किल लॅब सुरू केली. स्किल लॅबमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. २०१४ च्या जानेवारी फेब्रुवारीत एकूण ६४ बालमृत्यू झाले होते. परंतु २०१५ च्या जानेवारी फेब्रुवारीत एकूण १६ बालमृत्यूंची नोंद आहे. मातामृत्यूंचे प्रमाणही तीनवरून एकवर आले आहे.

पाच विभागांचा समावेश
प्रसूतिपूर्वसेवा नोंदणी, प्रसूतिदरम्यान प्रसूतिपश्चात सेवा, नवजात बालकाची तातडीची सेवा, कुटुंब कल्याण सेवा, संसर्ग प्रतिबंध सेवा अशा पाच विभागांचा स्किल लॅबमध्ये समावेश आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील १,३४० चौरस फुटांमध्ये स्किल लॅब असेल. यात प्रसूती कौशल्य प्रशिक्षण आदी विविध प्रकारच्या प्रशिक्षण बॅचेस सुरू आहेत. डॉ.अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक