आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे पदाधिकारी लागले ‘विधानसभे’च्या तयारीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - काँग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये यादवी माजली असतानाच दुसरीकडे भाजपने मात्र विधानसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. दिनांक 3 जुलै रोजी आयोजित बैठकीसाठी मंगळवारी जिल्हाभरातून जवळपास 100 पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले. लोकसभेतील विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारल्याचे दिसत असून, काँग्रेस मात्र ऐन विधानसभेच्या तोंडावर संघर्षावर उतरले आहे. एकंदरीत राजकीय वातावरण चांगलेच तापायला
लागले आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशची बैठक मुंबई येथे 3 जुलै रोजी शिवाजी राजे भोसले क्रीडा संकुल अंधेरी येथे होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश प्रभारी खासदार राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

पदाधिकारी रवाना
या बैठकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातून जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, मंडळाचे अध्यक्ष, महामंत्री, जिल्हा आघाड्यांचे अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, नगर परिषद, जिल्हा परिषद सदस्य, असे जवळपास 100 पेक्षाही जास्त पदाधिकारी आज रवाना झाले. या पदाधिका-यांना वरिष्ठ नेते निवडणुकीचा कानमंत्र देणार आहे. मुंबईच्या बैठकीवरून परतताच सर्व पदाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात विधानसभेची तयारी करणार आहे.

दोन्ही पक्षांमधील विरोधाभास चर्चेत
यवतमाळातील काँग्रेस तसेच भाजपमध्ये सध्या विरोधाभास बघायला मिळत आहे. एकीकडे भाजप विधानसभेची तयारी करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पदाधिकारी विरुद्ध आमदार असा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या तयारीसाठी जवळपास 100 भाजपचे पदाधिकारी आज मुंबईला रवाना झाले, तर आमदारांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी जवळपास 50 कॉँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीकडे दिनांक 5 जुलै रोजी रवाना होत आहे. काँग्रेस तसेच भाजपमधील हा विरोधाभास चर्चेचा विषय झाला आहे. या घटनांचे परिणाम नेमके निवडणुकीत काय पडतात, हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार
यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यात सर्वाधिक इच्छुक उमेदवार यवतमाळ मतदारसंघात आहे. काँग्रेस तसेच भाजप या दोन्ही पक्षांत उमेदवारांच्या रांगा लागल्या आहे. भाजपमध्ये राजाभाऊ ठाकरे, मदन येरावार, बाबासाहेब गाडे पाटील, राजू पडगिलवार, अमोल ढोणे, मनोज इंगोले, अजय राऊत यांच्यासह अनेक जण शर्यतीत आहे. तिकडे काँग्रेसमध्येसुद्धा राहुल ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर, अरुण राऊत, देवानंद पवार, संजय देशमुख, संध्याताई सव्वालाखे, अशी लांबलचक यादी तयार होत आहे. इतर मतदारसंघात मात्र एवढे स्पर्धक नाहीत.

आम्ही तयार आहोत - लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले. आता तसेच यश विधानसभेत प्राप्त करण्यासाठी आम्ही तयार आहोत. जिल्हास्तरावरील एक बैठक नुकतीच पक्षाचे संघटनमंत्री रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लवकरच बैठका घेऊन तसेच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन विधानसभेची तयारी आम्ही करणार आहोत.’’ मनोज इंगोले, महामंत्री, भाजप, यवतमाळ.