आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकल्यात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अचानक आलेल्या अवेळी पावसामुळे लहान मुलांमध्ये दमा व ‘व्हायरल इन्फेक्शन’चे प्रमाण वाढले आहे. परिणामी, शहरातील रुग्णालयांत सर्दी व खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी (दि. 18) शहरातील काही रुग्णालयांचा कानोसा घेतला असता, जिकडेतिकडे ‘खो- खो’ असा एकच आवाज कानी पडत होता.

हवामानातील बदल व ढगाळी वातावरणामुळे काही दिवसांपासून थंडी कमी झाली होती. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांतही घरोघरी पंख्यांची गती वाढली होती. दरम्यान, दमट वातावरणाचा खेळ सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांत वातावरण अचानक ढगाळ बनले अन् शुक्रवारी (दि. 19) रात्री अकाली पावसाने दमदार हजेरी लावली. हवामानात झालेल्या बदलामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे प्रमाण वाढले. शुक्रवारच्या रात्री झालेल्या पावसाचे पडसाद मानवी शरीरावर पडू लागल्याने आबालवृद्धांना सर्दी व खोकलासारख्या ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

अस्थमा व लहान मुलांमधील सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा वातावरणात रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. ज्या गोष्टींपासून आजार बळावतो, त्या गोष्टींपासून रुग्णांना दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सर्दी, खोकल्यासोबतच डायरियासारख्या आजारांमध्येदेखील वाढ झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.