आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादीत नाव आहे का.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी घोषित करताना जिल्हा प्रशासनाने वगळलेल्या नावांचीही यादी घोषित केली आहे. तेव्हा आपले नाव वगळलेल्या नावांच्या यादीत तर नाही ना, याची खातरजमा करून घ्या. तसे न केल्यास ऐन मतदानाच्या वेळी हिरमोड होऊ शकतो.

वयोमानानुसार मृत झालेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया अविरत सुरू असते. शिवाय जिल्ह्याचे रहिवासी असतानाही नोकरी अथवा शिक्षणासाठी परगावी राहणारे निवडणूक यंत्रणेच्या तपासणीदरम्यान उपलब्ध होत नाहीत. अशा व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय एका परिसरातून दुसर्‍या क्षेत्रात स्थानांतरण झाल्याने व्यक्तींची अनुपलब्धता हेही नावे वगळण्यामागचे एक कारण आहे. नव्याने नावाच्या समावेशासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची नावे मतदार यादीत नव्याने समाविष्ट केली जातील. ही प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरू राहणार आहे.

अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी तिवसा, धामणगावरेल्वे व मोर्शीचा काही भाग लोकसभेच्या वर्धा मतदारसंघात मोडतो, तर मोर्शी मतदारसंघाचा उर्वरित भाग रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 21 लाख 11 हजार 318 आहे. यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्यांची संख्या 72 हजार 738 आहे. त्याचवेळी सुमारे सात हजार 450 जणांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रत्येक मतदारसंघाच्या काही भागांमध्ये राबवण्यात आलेल्या तपासणी अभियानादरम्यान (रॅन्डम व्हेरिफिकेशन) हे मतदार अनुपस्थित आढळले, असे यंत्रणेचे म्हणणे आहे.

मतदानाचा हक्क प्रयत्नपूर्वक मिळवावा लागतो. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेशी संपर्क करणे, मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठीचा अर्ज मिळवणे, तो भरून आवश्यक कागदपत्रांसह संबधित यंत्रणेच्या स्वाधीन करणे आदी टप्पे पूर्ण करावे लागतात. मात्र, बरेचदा असे करूनही ऐन मतदानाच्या दिवशी नाव सापडत नाही. या पार्श्वभूमीवर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट झाले की नाही, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अलीकडेच अमरावती जिल्ह्याची मतदार यादी प्रकाशित केली आहे.

आपापल्या नावांची खात्री करून घ्या
मतदार यादीचे अधिकृत प्रकाशन झाल्यामुळे ती लोकांसाठी उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते ब्लॉकस्तरीय अधिकारी असलेल्या घटकांपर्यंत तिची उपलब्धता आहे. त्यामुळे मतदार झालेल्या प्रत्येकाने आपापली नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत की नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. पुन्हा नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध आहे. रवींद्र धुरजड, जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी.

याद्यांचे खर्‍या अर्थाने सार्वत्रिकीकरण करा
मतदान करणे हा अमूल्य व सर्वोच्च् हक्क आहे. तो प्रत्येकाला बजावताच आला पाहिजे. अनेकदा हा हक्क हिरावला जातो. केवळ क्षुल्लक कारणे पुढे करून मतदानाची संधी नाकारली जाते. मतदार याद्यांचे खर्‍या अर्थाने सार्वत्रिकीकरण करून ती गावपातळीपर्यंत उपलब्ध करून दिली पाहिजे. याबाबत जनजागृतीवर अधिकाधिक भर देण्याची गरज आहे. सुनील घटाळे, राज्य सहसचिव, अ.भा. नौजवान सभा.

नेट यूर्जसना सोपा पर्याय
वेबसाइटवर देशभरातील मतदार यादीची संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली आहे. होमपेजवर आधी जिल्हा व त्यानंतर विधानसभेचा मतदारसंघ निवडला, की प्रत्येकाला त्या-त्या मतदारसंघाची यादी पाहायला मिळते. या यादीसोबतच ‘डीलीटेड वोटर्स’चा ऑप्शन देण्यात आला असून, त्यामध्ये नावे शोधणे सोयीचे आहे. आपण हयात असूनही आपले नाव वगळले असेल, तर नाव नव्याने समाविष्ट करणे शक्य आहे.

वगळलेल्यांना पुन्हा संधी
मतदार यादीतून नाव वगळले गेल्यास नाव नव्याने दाखल करण्याची संधी आहे. त्यासाठी छापील अर्जाशिवाय ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध आहे. कोणी कोठेही असो, त्याला बसल्या जागी अर्ज भरता येईल, अशी व्यवस्था उपलब्ध आहे.

मतदारसंघनिहाय वगळलेली नावे
बडनेरा 184
तिवसा 87
अमरावती 486
मेळघाट 672
मोर्शी 341
दर्यापूर 1176
धामणगावरेल्वे 2015
अचलपूर 2501