आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार याद्यांतील गोंधळाला प्रशासन जबाबदार की मतदार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हायप्रोफाइल झालेली अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आणखी एका वादंगाने चांगलीच गाजली. हजारो मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. नागरिकांनी मतदार याद्यांमध्ये आपल्या नावाची पडताळणी केली नसल्याने त्यांना मतदान करता आले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता या सावळ्या गोंधळाची चौकशी करण्याची मागणी संतप्त नागरिकांतून होत असून, झालेल्या गोंधळाला नेमके कोण जबाबदार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मतदार गाफील राहिले की प्रशासनाचा बेजबाबदारपणा, हे चौकशीअंती स्पष्ट होणार असले, तरी हजारो मतदारांना मात्र त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्यापासून वंचित राहावे लागले.
मतदार यादीत नाव नसल्याने गुरुवारी (दि. 10) मतदानापासून वंचित राहिलेल्या हजारो मतदारांबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. शिवसेनेचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांनी याबाबत तक्रार केली होती.
निवडणूक आयोगाने दिलेली ओळखपत्रे आहेत म्हणजेच ते मतदार आहेत, असे अडसूळ यांचे म्हणणे होते. घोळ लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, निवडणूक निरीक्षक, राज्याचे निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त अशा सर्वच पातळ्यांवर तक्रार केली. परंतु, याबाबतचा अंतिम निर्णय हा त्या-त्या मतदारसंघाच्या मुख्य जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यालाच घ्यायचा असल्याने कारवाईचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात पोहोचला आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींची तक्रार आणि एसडीओ कार्यालय व जिल्हा कचेरीत नागरिकांनी केलेला प्रचंड जमाव यामुळे संबंधितांच्या नावाची यादी मतदार माहिती केंद्रात तयार करण्यात आली होती. ओळखपत्रे आहेत, यादीत नावे नाहीत, अशा सर्व नागरिकांचे नाव व फोन नंबर लिहून घेण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांनी काही निर्णय घेतल्यास तसे कळवण्यात येईल, असे संबंधितांना सांगण्यात आले.