आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीच्या ढिगार्‍याखाली होऊ शकते गाव गडप; दोन बाजूंनी वेकोलिचे ढिगारे, तर एका बाजूने वाहतो वर्धा नदीचा प्रवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - गावाशेजारी वेकोलिने लावलेले मातीचे प्रचंड ढिगारे अन् दुसरीकडे दुथडी भरून वाहणारी वर्धा नदी. या दोन्हींच्या मध्ये जीव मुठीत घेऊन जगणारे अहेरी गाव. परिसरात 24 तास सुरूअसलेल्या ब्लास्टिंगमुळे गावाशेजारी असलेला मातीचा ढिगारा कोणत्याही क्षणी कोसळून अख्खे गाव गडप होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’च्या दुर्घटनेनंतर ही भीती अधिकच गडद झाली आहे. मात्र, वेकोलि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ वास्तव्य करीत आहेत. दुर्घटनेच्या आधी या नागरिकांचे पुनर्वसन होईल काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वणी तालुक्यातील अहेरी गावाशेजारीच वेकोलिने मातीचे कृत्रिम पहाड तयार केले आहेत. पूर्व-पश्चिमेला असलेले मातीचे ढिगारे अगदी गावालगतच असल्याने संपूर्ण गाव संकटाच्या छायेत आहे, तर उत्तरेला अगदी गावाशेजारीच वर्धा नदी वाहत आह़े परिणामी, पुराचा धोकाही कायम आहे. वेकोलिच्या वणी उत्तर क्षेत्रात येणारे साधारण एक हजार लोकसंख्या असलेले अहेरी हे गाव आहे. या गावातील 537 हेक्टर जमीन वेकोलिने हस्तांतरित केली आहे. केवळ 21 हेक्टर जमीन येथील शेतकर्‍यांकडे आह़े शेतकर्‍यांच्या जमिनी वेकोलिने ताब्यात घेतल्यानंतर येथील बहुतांश शेतकरी शहरात वास्तव्य करायला आले. गावात केवळ शेतकरी व मजूर अशा जवळपास 400 लोकांची वस्ती आह़े.
अगदी गावाशेजारीच म्हणजे 50 मीटर अंतरावरच गावाच्या पूर्व-पश्चिमेला वेकोलिने कोलारपिंप्री व जुनाड या खुल्या कोळसा खाणीतील उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे टाकून कृत्रिम पहाडच तयार केला आह़े खाणीमध्ये होणार्‍या ब्लास्टिंगमुळे या ढिगार्‍याची माती खचून खाली घसरत आह़े दोन्ही ढिगार्‍यांच्या कैचीत हे गाव अडकले आहे, तर उत्तरेला वर्धा नदी अगदी गावालगतच वाहत आह़े मातीच्या ढिगार्‍यामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी संपूर्ण गावात शिरत असल्याने या गावाचा संपर्क तुटतो.जेव्हा नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा तर संपूर्ण गावच दहशतीत असते. गावाला जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग आह़े तिन्ही बाजूंनी गावाला प्रचंड प्रमाणात धोका आह़े यासंबंधी येथील ग्रामपंचायतीने वेकोलि प्रशासन व तहसीलदारांना वारंवार पत्रव्यवहार केला; परंतु वेकोलिने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, येथून वाहणारा नालाही वेकोलिने बंद केला आह़े त्यामुळे येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

ढिगार्‍यालगतच शाळा अन् अंगणवाडीही
अहेरी येथील शाळा व चिमुकल्यांची अंगणवाडी अगदी ढिगार्‍यालगतच आहे. अंगणवाडी व शाळेच्या भिंतींना खाणीमध्ये होणार्‍या ब्लास्टिंगमुळे तडे गेले आहेत. सोबतच गावात असे एकही घर नाही, की ज्या घरांच्या भिंतींना भेगा नाहीत, हे येथील वास्तव आहे.
पुनर्वसनाचा ठराव धूळखात
4ग्रामपंचायतीने गावाचे पुनर्वसन करण्यासंबंधी सन 2006 पासून अनेक निवेदने दिली. सन 2011 मध्ये पुनर्वसनाचा ठराव घेऊन तोही सादर केला. आजही हा ठराव सरकारदरबारी तसेच वेकोलिकडे धूळखात पडला आहे. पुनर्वसन न झाल्याने गावकर्‍यांचा जीव आता धोक्यात आला आहे. संजय खाडे, उपसरपंच, अहेरी.
ब्लास्टिंगच्या वेळी ग्रामस्थ घराबाहेर : गावाशेजारी जुनाड, कोलार पिंप्री, पिंपळगाव व नदीच्या दुसर्‍या टोकावरील म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव, कुनाडा येथील कोळसा खाणींमध्ये होणार्‍या ब्लास्टिंगच्या धाकाने अहेरीतील ग्रामस्थ घरात न थांबता त्या वेळी घरातून बाहेर येतात. सध्या संपूर्ण ग्रामस्थ दहशतीच्या वातावरणात जगत आहेत.

अहेरी गावाच्या अगदी जवळच वेकालिने मातीचे भलेमोठे ढिगारे लावले असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शाळेच्या अगदी मागेच लावलेले ढिगारे धोक्याची शक्यता स्पष्ट करतात. छाया : रवि ढुमणे