आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर स्वच्छतेसाठी ‘कॉमन मॅन’ रस्त्यावर, नागरिक झाले होते या मोहिमेत सहभागी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कचरामुक्त अमरावतीसाठी ठोस पाऊल उचलताना शहरातील विद्यार्थी, प्राध्यापक, शासकीय कर्मचाऱ्यांनी रविवारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. स्वत:चे घर स्वच्छ ठेवताना मनात निर्माण होणारी आपलेपणाची भावना शहर स्वच्छतेच्या बाबतीतही सामान्यांमध्ये रुजावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यापुढे प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्पही उपक्रमात सहभागी नागरिकांनी या वेळी केला.
आपलं शहर सुंदर, स्वच्छ निरोगी राहावं, यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. लोकांना स्वच्छतेची सवय पडावी, जेणेकरून शहरात कचऱ्याची समस्याच निर्माण होणार नाही. यासाठी समविचारी तरुणांनी एकत्र ऐऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रविवारी सकाळी प्रभात चौकापासून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. परिसरातील प्रतिष्ठानांमधून निर्माण होणारा कचरा नागरिकांनी या वेळी गोळा केला महापालिकेच्या वाहनात टाकला. त्यानंतर शिवाजी मार्केट, श्याम टॉकिजच्या मागील सर्व्हिस लाइन स्वच्छ करण्यात आली. राजकमल चौक, जयस्तंभ चौक हा परिसरही नागरिकांनी झाडून साफ केला. सुमारे ३० जण या मोहिमेत सहभागी झाले होते. आनंद आमले, संदीप पवार, उमेश वाघ, दिनेश वाटकर, संदीप अढाऊ, भुजंगराव डबाळे, सादिक पटेल, समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी पंकज गावंडे, महेश गभणे, विजय बागडे, हर्षल इंगोले, विद्यार्थी सूरज गवई, रोहित भालेकर, मयूर इंगळे, स्वाती माकोडे, हेमंत खेरडे आदींचा या अभियानात सहभाग आहे.
प्रभात चौकापासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी अनेक गल्ल्या, सर्व्हिस लाइन स्वच्छ केल्या.
स्वच्छतेबाबत रुजावी सकारात्मक सवय
संपूर्ण शहर कचरामुक्त व्हावे. व्यावसायिकांनी आपल्या परिसरातील कचरा कचरापेटीतच टाकायला हवा. रहिवाशांनीही इतरत्र कचरा टाकू नये. स्वच्छतेबाबत चांगली सवय लोकांना लागावी, यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. पुढील रविवारी समाजकार्य महाविद्यालयातर्फे कर्मचारी आणि विद्यार्थी एकत्र येऊन मोहीम राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. शहरातील इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. पंकजगावंडे, कर्मचारी,समाजकार्य महाविद्यालय