आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये 'जलनासाडी' 30 अब्ज लिटरची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अप्पर वर्धा धरणातून 24 तास पाणीपुरवठय़ाच्या मृगजळामागे धावत असलेले आणि नियमित पाणी मिळत असल्याने एक एक थेंबाच्या मूल्याचे विस्मरण झालेले अमरावतीकर वर्षाकाठी तब्बल 28 अब्ज 17 कोटी 20 लाख 16 हजार लिटर पाण्याची नासाडी करतात. जलत™ज तथा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ‘दिव्य मराठी’ यांनी केलेल्या स्वतंत्र पाहणीचा हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

मजीप्राच्या पाहणीनुसार, रोज 35 दशलक्ष लिटर पाण्याची अमरावतीकर नासाडी करतात. अप्पर वर्धा धरण सक्रिय झाल्यानंतर 1993 पासून अमरावतीमध्ये नियमित पाणीपुरवठा होत आहे. सद्य:स्थितीत शहरात 72 हजार नळ जोडण्या आहेत. पाहणीनुसार प्रत्येक घरातून दररोज किमान एक हजार 200 मिलिलिटर (सुमारे सव्वा लिटर) पाणी कोणतेही ठोस कारण नसताना निव्वळ वाया घालवले जाते.

असे झाले सर्वेक्षण
बडनेरा, राजापेठ, राजकमल, विद्यापीठ परिसर, दस्तुरनगर, एमआयडीसी, पंचवटी, रहाटगाव रोड, गाडगेनगर, विलासनगर, इतवारा, वलगाव रोड, रविनगर या भागांतील झोपडीपासून बंगल्यापर्यंत अशा एकूण 10 घरांची प्रातिनिधिक स्वरूपात निवड करण्यात आली. मजीप्रा प्रत्येक व्यक्तीसाठी 110 लिटर पाणीपुरवठा करते. त्यानुसार या 10 घरांच्या पाण्याच्या मीटरचे रीडिंग नोंदवण्यात आले.

घरातील सदस्यांची संख्या मोजण्यात आली. त्याचे मोजमाप करण्यात आले. नळ आल्यानंतर या ठिकाणी नोंदी घेताना लोक कशासाठी पाणी वापरतात, याचे निरीक्षण करण्यात आले. त्याआधारे सरासरी एका घरातून कमीत कमी 1200 मिलिलिटर पाणी वाया जातेच, असा निष्कर्ष निघाला. मजीप्रा आणि जलतज्ज्ञांच्या मते, हा आकडा यापेक्षा अधिक आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे ते म्हणतात.


यासाठी होते नासाडी

  • शौचालयात अनावश्यक फ्लश वापरला जातो.
  • सफाई झाल्यावरही वाहनांवर पाइपने पाणी.
  • जनावरे, गोठा धुण्यास वापर.
  • स्वच्छ असतानाही अंगणात पाणी टाकले जाते.
  • घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर पाणी मारणे.
  • जुन्या घराच्या भिंतींवर पाणी मारले जाते.
  • ओव्हर फ्लोनंतरही टाक्यातील नळ सुरूच.


‘वॉटर ऑडिट’ नाही
अमरावती शहरात आतापर्यंत पाण्याचे अंकेक्षणच झालेले नाही. पाणीपुरवठा करणार्‍या एजन्सी केवळ प्रतिव्यक्ती किती पाणी लागते, याचा हिशेब लावून पुरवठा करतात. पण, कोणत्या विभागात किती पाणी वाया जातेय, का वाया जातेय, याची अधिकृत नोंद कुठेही केली जात नाही.

तज्ज्ञ म्हणतात.
शेजार्‍यांचा धडा घ्यावा

येळगाव धरण शेजारी असले तरी बुलडाण्याला चार दिवसांआड पाणी मिळते. अकोल्यासाठी महान धरण असतानाही हीच स्थिती आहे. अप्पर वर्धाचे पाणी मुबलक आहे. मात्र, शेजार्‍यांचा धडा घेऊन अमरावतीकरांनी पाण्याची बचत करावी आणि पाणी वाचवावे. डॉ. गणेश वानखेडे, पर्यावरण, प्राणिशास्त्र अभ्यासक.

घाबरू नका, पण सजग रहा
460 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करीत अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणी मिळते. धरण मोठे आहे, पाणी मुबलक आहे, पण नैसर्गिक संपत्तीचा नाश करणे अयोग्य आहे. आम्ही लोकांना घाबरवू इच्छित नाही. पण, पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकानेच सजग राहावे. अरविंद सोनार, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.

सरासरी 25 टक्के अपव्यय
ग्रामीण भागात 30 टक्के पाण्याचा अपव्यय होतो. अमरावती शहरात जलवाहिनीला गळतीचे प्रमाण कमी आहे. परंतु, लोकांच्या निष्काळजीपणामुळे 25 टक्केपाणी रोज वाया जाते. अप्पर वर्धा धरणामुळे लोक बिनधास्त झालेत. ते पाण्याचे मूल्य विसरले आहेत. श्वेता बॅनर्जी, जलतज्ज्ञ तथा कार्यकारी अभियंता.