आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष : अमरावती जिल्ह्यातील ‘दुष्काळ’ पेटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरदेखील राजकमल ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत प्रहारने मोर्चा काढला. विभागीय आयुक्त कार्यालय येथे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
पोलिसांचे दोन बॅरिगेड्स तोडून शेतकरी प्रहार कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा, तर पोलिस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांकडून उभारण्यात आलेले तिसरेही बॅरिकेड्स शेतकऱ्यांकडून तोडले जातात की काय, अशी बिकट स्थिती या वेळी निर्माण झाली होती.
आधी पावसाची दडी, नंतर अतिवृष्टीने गारद शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून विदर्भात दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेऊन संपूर्ण जिल्हा पेटला. पिके हातची गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयावर साेमवारी (दि. १७) रात्री टेंभा मोर्चा काढला. निसर्गासोबत शासनाकडून बोळवण होत असल्याने प्रशासनालादेखील संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
टाउन हॉलमध्ये दोनदा अंधार
चंद्रकांत वानखडे यांचे भाषण संपल्यानंतर विजय विल्हेकर यांनी हाती माइक घेताच वीज गुल झाली. फोना-फोनी केल्यानंतर वीज आली खरी, मात्र विल्हेकर यांनी कविता सुरू करताच पुन्हा वीज गेली. या वेळी संपूर्ण टाउन हॉलमध्ये अंधार पसरला होता. अंधारातच विल्हेकर यांनी कविता सांगण्यास सुरुवात केली. वीज आल्याने आमदार कडू यांनी आयुक्तालयाकडे कूच करण्याचा निर्णय घेतला.
आयुक्तालयात दुपारी झाली बैठक
मोर्चा काढण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. दुपारी झालेल्या मॅराथॉन बैठकीत कोणताही तोडगा निघाल्याने मोर्चा घेऊन येणार असल्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला. आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना दुष्काळ का घोषित करत नाहीत, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. आमदार कडू यांच्यासोबत शेतकरी नेते चंद्रकांत वानखडेदेखील उपस्थित होते.
पोलिसांची दमछाक
सायंकाळचा मोर्चा असला, तरी नेहरू मैदान येथे दुपारपासूनच बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रहारच्या आंदोलनाची पूर्वसूचना असल्याने प्रशासनानेदेखील तयारी केली होती. मात्र, त्यानंतर देखील त्यांना मोर्चा रोखता आला नाही. नेहरू मैदान येथून प्रहारचे कार्यकर्ते वाहनामागे धावतच निघाले. एरवी धावण्याची सवय तुटलेल्या पोलिसांची मात्र यामुळे चांगलीच दमछाक झाली. पोलिसांची वाहने समोर आणि मागे मोर्चा, असे चित्र या प्रसंगी दिसून येत होते.