आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नळ कनेक्शनला लागणार दुप्पट रक्कम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नळ कनेक्शन घेताना खोदकामासाठी आता दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे. यामुळे शहरात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. नवीन सीएसआर लागू करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून नळ कनेक्शनसाठी केल्या जाणार्‍या खोदकामाचा यात समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या या नव्या धोरणाचा फटका शहरातील अध्र्याअधिक कुटुंबांना बसणार आहे.

मजीप्राकडून नळ कनेक्शन घेताना रस्ते खोदकामासाठी महापालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. यासाठी शासन आदेशाप्रमाणे पूर्वी दर आकारणी केली जात होती. स्थायी समितीने निश्चित केलेले दर ग्राहकांकडून वसूल केले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. 18) धोरण निश्चित करताना विविध मोबाइल कंपन्यांचे ऑप्टिकल फायबर, टेलिफोन विभागाचे डक्ट, विद्युत विभागाच्या केबलसाठी नवीन सीएसआरनुसार दर निश्चित करताना मजीप्राकडून केल्या जाणार्‍या नळ कनेक्शनचा यात समावेश करण्यात आला.

शहर अभियंता कार्यालयाकडून रस्ते खोदकामाबाबत नवीन सीएसआर दर लागू करण्याबाबत प्रशासकीय विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. रिलायन्स जियो इंफोकॉमच्या केबल डक्ट खोदकामासाठी जुन्या सीएसआरनुसार शुल्क आकारणी करण्यात आल्याने महापालिकेत मोठे वादंग निर्माण झाले होते. व्यापार करण्यास आलेल्या कंपन्यांकडून जादा दराने मोबदला वसूल करण्याची बाब योग्य होती; जीवनावश्यक घटक असलेल्या पाण्याबाबत धोरण निश्चित करताना कोणताही विचार न होणे अनाकलनीय आहे. रस्ते खोदकामाबाबत धोरण निश्चित करण्यात आल्याने नागरिकांना आता नळ कनेक्शनसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला पाणी तेही 24 तास मिळावे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असताना महापालिकेकडून करण्यात आलेल्या धोरणांमुळे त्याला फाटा बसणार आहे. शिवाय शहरातील अनेक सामान्य नागरिकांना पाणी मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ यामुळे येणार आहे.

15 ते 20 हजार येणार खर्च
नळ कनेक्शन घेताना रस्ते खोदकामाबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. याबाबत महापालिकेत निश्चित धोरण नसल्याने शासन आदेशाप्रमाणे आणि स्थायी समितीने मान्यता दिलेल्या दराप्रमाणे त्यासाठी मोबदला घेणे गरजेचे होते. पूर्वी यासाठी सहा ते 10 हजार रुपयांपर्यंत खर्च येत असे. आता तो 12 ते 20 हजार रुपयांपर्यंत करावा लागणार आहे. पूर्वी असलेल्या दरामध्ये धोरण निश्चित करताना दुपटीने वाढ करण्यात आल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.

सुधारणा करता येईल
नागरिकांच्या दृष्टीने पाण्याचा विषय महत्त्वपूर्ण आहे. सर्वसाधारण सभेत सरतेशेवटी या विषयाला मंजुरी देण्यात आली. नळ कनेक्शनसाठी नवीन सीएसआर लावल्यास नागरिकांवर भुर्दंड पडेल. पाणी मूलभूत गरजेमध्ये मोडत असल्याने त्याबाबत सुधारणा केली जाणार आहे. वंदना कंगाले, महापौर

.नागरिकांचे हाल
खोदकामाबाबत असलेले नवीन सीएसआरचे दर नळ कनेक्शन घेण्यासाठी लावण्यात आल्यास नागरिकांचे हाल होणार आहेत. नवीन धोरणामध्ये मजीप्राकडून नळ घेताना केल्या जाणार्‍या खोदकामासाठी नागरिकांवर अधिक भुर्दंड पडेल. यामुळे त्यांचे हाल होतील. धीरज जयस्वाल, प्रहार संघटना

सभेची मान्यता घेऊन प्रत्येक वर्षी बदलेल दर
रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी ही परवानाधारकाची असल्याने त्याकरिता शासन निर्णयाप्रमाणे दर आकारणी केली जात होती. परंतु, रस्ते दुरुस्ती करीत असताना मानकाप्रमाणे होत नसल्याने प्रचलित सीएसआरनुसार मान्यता देण्यात आली आहे. दरवर्षी दरसूची नवीन निघाल्यानंतर त्यावर्षीच्या सीएसआर दराप्रमाणे दर काढून त्यास वेळोवळी सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन, ते निश्चित करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.