आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाईवर उपाय कमी, आरोपांच्या फैरी जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- अचलपूर, परतवाडा या जुळय़ा शहरांतील लीकेज पाइप लाइनमुळे होणारा दूषित पाणीपुरवठा व काही भागांत भेडसावणार्‍या पाणीटंचाईमुळे जनता वैतागली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सोडून आगामी विधानसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून राजकारणी मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून पाण्याचे राजकारण करीत आहेत.

शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी अचलपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने भर उन्हाळय़ात नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी पाइप लाइन लीकेज झाल्याने नळांना दूषित पाणी येत आहे.

या पाण्यामुळे घरोघरी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वॉर्डातील नागरिकांच्या दूषित पाण्याच्या तक्रारी लक्षात घेऊन नगरसेवकांनी आपल्या स्तरावर खासगी जेसीबीद्वारे खड्डे करून पाइप लाइनचे लीकेज शोधण्याचा प्रयत्न केला; तरीही पालिका प्रशासनाने कोणताही पुढाकार घेतला नाही. दूषित पाणीपुरवठय़ाच्या तक्रारीनंतर आमदार बच्चू कडू यांनी टपालपुरा भागातील टाकीची पाहणी करून साफसफाई होईपर्यंत तात्पुत्या स्वरूपात पाणी साठवणूक करू नका, असे अधिकार्‍यांना निर्देश दिले. मात्र, अधिकार्‍यांनी टाकीची सफाई झाल्यानंतरही पाइप लाइन लीकेजमुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने टाकीत पाणी साठवणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अभियंता जोशी यांनी सांगितले.

पाणी साठवणूक थांबल्याने शहरातील पाणी समस्येच्या तक्रारी वाढल्या. 29 मे रोजी नगराध्यक्ष अरुण वानखडे हे बाहेरगावहून शहरात आल्यानंतर त्यांनी- आमदारांनी टाकीत पाणी साठवणूक बंद करण्याचे निर्देश दिल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचे सांगितले; तसेच टाकीत पाणी भरण्याचेही आदेश दिले. त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना भेटून पाइप लाइनची गळती रोखण्याचे सोडून आमदारांवर खोटे आरोप का करता, असा प्रश्न उपस्थित केला. पाणीटंचाईसंदर्भात ठोस उपाययोजना करणे सोडून आरोप-प्रत्यारोपांद्वारे राजकीय कुरघोडीचा प्रयत्न सध्या चर्चेचा व संतापाचा विषय ठरला आहे.