आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Purification Center,Latest News In Divya Marathi

जलशुद्धीकरण केंद्रावरील ताण वाढला; धरणातूनच होतोय अशुद्ध पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरामध्ये नळांद्वारे येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गढूळ पाण्याबाबत नागरिकांकडून तक्रारीदेखील केल्या जात आहेत. मात्र, पुरामुळे पाण्याचा केवळ रंग बदलला आहे. पाण्यामध्ये गाळ नसून, शुद्धीकरण होत असल्याने पाणी पिण्यास योग्य असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.
अमरावती व बडनेरा शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गाडगेनगर, तपोवन, महादेव खोरी, राजकमल, अंबागेट परिसर, राजापेठ, सातुर्णा, नवसारी, कलोतीनगर, बडनेरा आदी सर्वच भागांमध्ये नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून मजीप्राच्या विभागाकडून तपोवन भागातील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रियादेखील केली जाते. धरणामध्ये नव्याने आलेले पुराचे पाणी आणि एकाच वेळी 13 दरवाजे उघडल्याने प्रकल्पातील पाणी ढवळून निघाले आहे. गाळ येऊ नये म्हणून मजीप्राकडून धरण्याच्या तळाशी असलेले पंप पूर्वीच बंद करण्यात आले. त्यावरील पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जात असल्याने त्यामध्ये गाळ येण्याची शक्यता फार कमी आहे. पुराच्या पाण्यामुळे अप्पर वर्धा प्रकल्पातील पाण्याला पिवळसर रंग प्राप्त झाला आहे. धरणातून येणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करीत दर तासाला त्याची तपासणीदेखील केली जाते. त्यामध्ये अँलम व क्लोरीन गॅस मिसळली जात असून, पाण्याला पिण्यायोग्य करण्याचे कार्य जलशुद्धीकरण केंद्रावर केले जात आहे.
एका तासाला 43 लाख लिटर पाणी
शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रत्येक तासाला 43 लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासत असल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागाला दिवसभर पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठय़ाचा ताण जलशुद्धीकरण प्रकल्पावरील कर्मचार्‍यांवर पडत आहे.