आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभर्‍याच्या अंकुरावर मोठी आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सोयाबीन, मूग, उडीद या खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या सर्व आशा आता रब्बीच्या हरभरा पिकावर केंद्रित झाल्या आहेत. यावर्षी खरिपात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्यामुळे रब्बीत हरभर्‍याचे क्षेत्र दीड लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे मूग, उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक तीन लाख 66 हजार 400 हेक्टरवर सोयाबीनची विक्रमी पेरणी करण्यात आली होती. यांपैकी जून-जुलैच्या पावसात 32 टक्के सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले होते. उर्वरित सोयाबीनपैकी ऑक्टोबरमध्ये बहुतांश सोयाबीन परतीच्या पावसाने कुजल्यामुळे शेतकर्‍यांना ते बेभाव विकावे लागले. सरासरी एकरी चार पोते उत्पादन झाल्यामुळे उत्पन्नातही प्रचंड घट झाली. सोयाबीनसाठी शेतकर्‍यांना एकरी 16 हजारांवर खर्च झाला होता; परंतु सरासरी उत्पन्न आठ ते दहा हजारांवर झाल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.

जिल्ह्यात 34 हजार 400 हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली होती. यातील खारपाणपट्टय़ात मुगाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. दरम्यान, पेरणीनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे व किडींनी अंदाजे 60 टक्के पिकांची हानी झाली; तसेच 48 हजार हेक्टरवरील उडिदाच्या पिकापैकी नगण्य पीक हाती आले. आता सर्व आशा रब्बीच्या पिकावर टिकल्या आहेत.

रब्बीत दीड लाख हेक्टर क्षेत्र हरभर्‍याखाली येणार
अतिवृष्टीचा फायदा रब्बीतील पिकांना होणार आहे. यावर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभर्‍याचे क्षेत्र अंदाजे 50 हजार हेक्टरने वाढणार आहे. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हरभर्‍याचे उत्पादनही चांगले होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी एक लाख तीन हजार 170 हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी झाली होती. यावर्षी सोयाबीनचेच क्षेत्र मोठे असल्यामुळे त्यावर बहुतांश हरभर्‍याची पेरणी होणार आहे. त्यामुळे यावर्षी हरभर्‍याचे क्षेत्र वाढून एक लाख 51 हजार हेक्टरवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच गव्हाच्या क्षेत्रातही दुपटीने वाढ होणार आहे. गेल्यावर्षी गव्हाचे क्षेत्र 34 हजार 38 हेक्टर होते. यावर्षी ते 70 हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. चिखलदरा, धारणी तालुक्यांत 28 हजार 692 हेक्टर जमीन पावसामुळे नापेर झाली होती. त्यामुळे या क्षेत्रावरही हरभर्‍याची लागवड होण्याची शक्यता आहे.