अमरावती - उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा संभ्रम बदलत्या वातावरणामुळे निर्माण झाला आहे. ग्रीष्म ऋतूमुळे अमरावतीचा पारा 42.4 अंश सेल्सियसवरून 43, 44 अंशांकडे सरकत आहे; परंतु चढत्या क्रमावर असलेल्या या पार्यावर अद्यापही पावसाचे सावट कायम आहे.
भारतीय मौसम विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने प्रकाशित केलेल्या उपग्रह छायाचित्रात 20.9258 अंश उत्तर आणि 77.7647 पूर्व अक्षांश रेखांशावर कमी दाबाच्या पट्टय़ातील ढग स्थिरावल्याचे आढळले आहे. हे अक्षांश, रेखांश अमरावती, अकोला जिल्ह्यांचे आहेत. छायाचित्रात दिसणारे ढग तुरळक प्रमाणात असले तरी अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्यासाठी पुरेसे असल्याचे हवामान विभागाच्या नागपूर येथील अधिकार्यांनी स्पष्ट केले. शुक्रवार, शनिवार दोन्ही दिवस अमरावती जिल्ह्यावर आभाळी वातावरणाचे सावट होते. शनिवारी सायंकाळी विजांचा लखलखाट अनेकांनी अनुभवला.
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तीव्र वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या लखलखाटाने पाऊस येतो की काय, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, किरकोळ पाऊस आल्यानंतर वातावरण पूवर्वत झाले. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास किरकोळ पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पाऊस काही मिनिटांपुरताच होता. त्यानंतर रविवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता.