आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Driver Drunk And Drive Car Then License Will Be Canceled

अमरावतीमध्‍ये मद्यधुंद वाहनचालकांचा आता परवाना होणार रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास पोलिस त्या चालकाविरुद्ध कारवाई करून सोडून देत असत. यापुढेही मद्यधुंद चालकांना पोलिस कारवाईअंती सोडून देतील. मात्र, त्या वाहनचालकाचा परवाना रद्द करावा, असे पत्र आरटीओला देतील. यासंबंधी पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी शहर वाहतूक शाखेला निर्देश दिले आहेत.

मद्य पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांची संख्या वाढते. हा संभाव्य धोका ओळखून पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरपासूनच शहरात कडेकोट व्यवस्था ठेवून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम राबवली. या कालावधीत 31 डिसेंबरपर्यंत पोलिसांनी 346 वाहनचालकांवर कारवाई केली; तसेच या वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मध्ये कारवाई झालेल्या वाहनचालकांचे परवाने रद्द करावेत, असे पत्र पोलिस आयुक्त पाटील आरटीओंना देणार आहेत. भविष्यातही ज्या वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवले आणि पोलिसांनी कारवाई केली तर त्या वाहनचालकाचा परवाना रद्द करण्याची शिफारस पोलिस आरटीओकडे करणार आहेत. तळीराम वाहनचालकांचे परवाने रद्द करावेत, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. याच आदेशाची अंमलबजावणी शहरात होणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

फॅन्सी क्रमांकांविरुद्ध उघडणार मोहीम
शहरात सध्या अनेक दुचाकी व चारचाकींवर फॅन्सी क्रमांक टाकून वाहने चालवली जात आहेत. या फॅन्सी क्रमांकांमुळे वाहनांवरील क्रमांक ओळखता येत नाहीत. त्यातच सध्या शहरात मंगळसूत्रचोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या वाहनावरील क्रमांक स्पष्ट ओळखता येईल, असे असावे. त्यामुळे फॅन्सी क्रमांक टाकणार्‍यांविरुद्धही शहर वाहतूक शाखा मोहीम उघडणार आहे.

एका दुचाकीवर दोनच शाळकरी विद्यार्थी
शाळेत पोहोचवून देण्यासाठी अनेक पालक एका दुचाकीवर तीन-तीन विद्यार्थ्यांना घेऊन जातात. मात्र, यापुढे शहरात एका दुचाकीवर दोनच विद्यार्थ्यांना घेऊन वाहनचालकांना प्रवास करता येणार आहे. दोनपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास त्या दुचाकीस्वाराविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.