आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Widlife Organ Selling News In Marathi, Forest Department, Divya Marathi

वन्यप्राणी अवयवांची विक्री; सात ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नेहरू मैदानात सुरू असलेल्या शिल्प बाजार प्रदश्रनात दोन दुकानांमधून वन्यप्राण्यांच्या अवयवांची खुलेआम विक्री करण्यात येत असताना रविवारी वनविभाग आणि मानद वन्यजीव रक्षक यांनी धाड टाकून ते अवयव जप्त केले. याप्रकरणी सहा महिला व एका पुरुषाला वनविभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ते प्राण्यांचे खरेखुर अवयव आहेत का, हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे.


नेहरू मैदानात काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिल्प बाजारात सहाव्या व चौदाव्या क्रमांकाच्या दुकानांमधून जडीबुटी साहित्य, गळ्यातील माळा अशा साहित्याची विक्री करण्यात येत आहे. या दुकानांमधून वाघनखे, कस्तुरी, वाघांप्रमाणे दात, सापांचे महत्त्वाचे अवयव, यांसारखी वन्यप्राणीसदृश अवयवयांची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षकांना मिळाली होती. त्यांनी वनविभाग अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिली. त्याआधारे रविवारी वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप लकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, सुभाष सोनोने यांच्यासह वनविभागाचे अन्य कर्मचारी तसेच जयंत वडतकर, विशाल बनसोड, यादव तरटे, गौरव कडू या मानद वन्यजीव रक्षक आदींनी या दोन्ही दुकानांवर छापा टाकला.


या दोन्ही दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवयव मिळाले असून, ते प्रथमदश्रनी खरे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ते खरेच प्राण्यांचे अवयव आहेत का हे तपासणी व चाचणीअंती स्पष्ट होईल, असे वनाधिकारी प्रदीप लकडे यांनी सांगितले.


वनविभागाने दुकान क्रमांक सहावरून दात, कस्तुरी, नखे, वाघांचा पंजा हे अवयव हस्तगत केले. या दुकानात वस्तू विक्री करणार्‍या चार महिला हरियाणा व कर्नाटकच्या असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एकीचे ओळखपत्र वनविभागाला मिळाले असून, त्यावर दीपावली असे नाव नमुद आहे. जप्त करण्यात आलेले अवयव खरे असल्यास त्या महिलांकडे हे अवयव कोठून आले, त्या खुलेआम विक्री कशा करीत आहेत, असे अनेक प्रश्‍न वनविभागापुढे उपस्थित झालेत.


वाघनखांची जोडी चार हजार रुपयांमध्ये
दुकानातून मिळणारे वन्यप्राण्यांचे अवयव महागडे असून, वाघनखांची जोडी चार हजार रुपयाला विक्री केली जात असल्याचे वन्यजीवमित्रांनी सांगितले. शिल्प बाजार प्रदश्रनात अशा दुर्मीळ अवयवांची विक्री होत असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.


असे फुटले बिंग
याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर मानद वन्यजीव रक्षकाने ग्राहक बनून या दुकानातून काही अवयव खरेदी केले. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वनविभाग अधिकारी व मानद वन्यजीव रक्षकांनी दुकानावर छापा टाकला.