आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला डॉक्टरच्या विश्वासाला 34 लाखांचा तडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मुधोळकरपेठेतील होमिओपॅथ डॉ. अलका आनंदीलाल राजपुरिया (50) यांचा विश्वास संपादन केल्यानंतर नागपूरच्या तथाकथित वैद्यकीय कंत्राटदाराने त्यांना 34 लाखांनी गंडा घातल्याचे रविवारी उजेडात आले. याप्रकरणी डॉ. राजपुरिया यांनी शनिवारी रात्री राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

डॉ. अलका राजपुरिया मागील 15 वर्षांपासून प्रॅक्टिस करतात. त्यांची दोन वर्षांपूर्वी नागपूर येथील वैद्यकीय कंत्राटदार अजय बद्रिनारायण सोनी याच्याशी ओळख झाली. त्याने लवकरच त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने मे 2013 मध्ये पुणे येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठय़ाची ऑर्डर मिळाल्याचे राजपुरिया यांना सांगितले. त्यासाठी पैसे कमी पडत असल्याने 15 ते 20 लाख मदत द्यावी, अशी अजयने विनंती केली. दोन वर्षांत कमावलेल्या विश्वासाच्या बळावर डॉ. राजपुरिया यांनी राजकमल चौकनजीक राजपुरिया मेडिकलमधून त्याला प्रत्येकी पाच लाखांचे दोन धनादेश दिले. त्यानंतर 15 आणि 16 मे रोजी दोन नातेवाइकांकडून पाच लाख रुपये मिळवून दिले.

अजयने सेवाग्राम येथील रुग्णालयाची ऑर्डर मिळाल्याचे सांगून पुन्हा पैशांची मागणी केली. तेव्हा डॉ. राजपुरिया यांनी 17 मे ते 25 मे दरम्यान 19 लाख 50 हजारांचे धनादेश दिले. अवघ्या 20 दिवसांत त्याला डॉ. राजपुरिया यांच्याकडून 34 लाख 50 हजार रुपये मिळाले. त्याने धनादेशाद्वारे मिळालेली रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केली. त्यानंतर पसार झाला. मोबाइलवर त्याच्याशी संपर्क होत नव्हता म्हणून डॉ. राजपुरिया यांनी तीन व 25 जुलैला नागपूर गाठले. मात्र, तेथही तो भेटला नाही. अजयने फसवणूक केल्याचे लक्षात येताच डॉ. राजपुरीया यांनी 20 दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवली होती. शनिवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण राजापेठ पोलिस ठाण्याकडे दिले. डॉ. राजपुरिया यांच्या तक्रारीवरून अजय सोनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.