आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Helpline Issue In Amaravati, Maharashtra

धुमाकूळ: 38 दिवसांत सहा लाख 65 हजारांचा ऐवज लंपास; महिला पोलिस चोरांचा बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात वाढलेल्या मंगळसूत्रचोरीच्या घटनांमुळे महिलांत प्रचंड धास्ती आहे. गेल्या 38 दिवसांत मंगळसूत्रचोरांनी धुमाकूळ घातला असून, तब्बल सहा लाख 65 हजारांचा ऐवज लंपास केला. या घटना थांबवण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकारीच आता रस्त्यावर उतरल्या आहेत. साध्या वेशातील महिला पोलिसच आता या भामट्यांचा बंदोबस्त करतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

शहरातील मंगळसूत्रचोरी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यासाठी त्यांनी पर्शिमसुद्धा घेतले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना त्यात यश आले नाही. याचवेळी मंगळसू़त्रचोरी होऊ नये, यासाठी महिलांनीच विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बुधवारी सकाळी नित्यानंद कॉलनीमध्ये झालेल्या घटनेनंतर पोलिसांना दुचाकीचा क्रमांक मिळाला होता. त्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 11 दुचाकींची तपासणी केली. मात्र, त्यातून ठोस काही हातात आले नाही.

घटना होऊ नये म्हणून..
रस्त्याने जाणार्‍या महिलांना एकांतात गाठून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करण्याच्या घटना सध्या सुरू आहेत. महिलांनी दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी दागिने घालून जाऊ नये. अशावेळी घरात दागिने ठेवले; तरीही चोरीची भीती राहते म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवावेत. निर्जन रस्त्याने जातेवेळी दागिने सांभाळण्याची विशेष गरज आहे; शिवाय महिलांनी अधिक सतर्क राहावे.

महिलांनी महागडे दागिने घातल्यावर विशेष काळजी घ्यावी
महिलांनी महागडे दागिने घातल्यावर निर्जनस्थळी शक्यतोवर पायी किंवा एकटे जाऊ नये. या वेळी दुचाकीने प्रवास केल्यास अधिक सोयीस्कर होईल. कारण आतापर्यंत झालेल्या बहुतांश घटना या निर्जनस्थळी झाल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महिलांनी जाणे शक्यतो टाळलेलेच बरे. सुरक्षेसाठी आता महिलांचे विशेष पथक तैनात राहणार आहे. या वेळी रोडरोमिओ आणि मंगळसूत्रचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न होणार आहे.
-सुषमा बावीस्कर, पोलिस उपनिरीक्षक

लवकरच ‘हेल्पलाइन’
मंगळसूत्रचोरी थांबवण्यासाठी पोलिसांनी आता विशेष महिला पथकांची स्थापना केली आहे. तसेच चार्ली कमांडोंना सूचना दिल्या आहेत. मोहल्ला समितीच्या बैठकीमध्ये नागरिकांनाही सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. कारण मंगळसूत्रचोरांना पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केल्यास पोलिसांना अधिक मदत होईल. यासोबतच पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरवासीयांसाठी लवकरच ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येणार आहे. हेल्पलाइनचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच एक क्रमांक जाहीर करण्यात येईल. हा क्रमांक डायल केल्यास अल्पावधीत पोलिस घटनास्थळी पोहचणार आहे. -अजित पाटील, पोलिस आयुक्त

दिवसभरात 90 दुचाकीस्वारांवर कारवाई
मंगळसूत्रचोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गोपालनगर टी-पॉइंट, वेलकम पॉइंट भागांमध्ये शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. या वेळी तब्बल 90 दुचाकी वाहनांना दंड ठोठावण्यात आला. दिवसभरात झालेल्या कारवाईत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला. ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाल उपाध्याय, आशीष रोही, महादेव मांजरकर व नीलेश पाटील आणि कर्मचार्‍यांनी केली.

विशेष योजना राबवण्याची गरज
38 दिवसांत शहरातील विविध भागांत 11 महिलांचे मंगळसूत्र भामट्यांनी लंपास केले आहेत. मात्र, पोलिसांना अजूनही चोरटे का मिळाले नाहीत? गांभीर्याने तपास केला आणि काही विशेष योजना राबवल्या तर चोरटे नक्कीच पोलिसांच्या हातात येतील.
-रजनी रावनकर, गृहिणी